मराठवाड्यात पाडळ, मोखा, बिजा व कौशीची झाडे झाली दुर्मीळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:02 AM2021-06-11T04:02:57+5:302021-06-11T04:02:57+5:30

औरंगाबाद: पश्चिमघाटामध्ये आढळणारे मोखा, कौशी, पाडळ, हुंब, सफेद कुडा, तांबडा कुडा, काकड, कारवी, सोनसावर, निर्मळी, बिजा, कुचला, डिकेमाली ...

Padal, Mokha, Bija and Kaushi trees became rare in Marathwada! | मराठवाड्यात पाडळ, मोखा, बिजा व कौशीची झाडे झाली दुर्मीळ !

मराठवाड्यात पाडळ, मोखा, बिजा व कौशीची झाडे झाली दुर्मीळ !

googlenewsNext

औरंगाबाद: पश्चिमघाटामध्ये आढळणारे मोखा, कौशी, पाडळ, हुंब, सफेद कुडा, तांबडा कुडा, काकड, कारवी, सोनसावर, निर्मळी, बिजा, कुचला, डिकेमाली इ. दुर्मीळ वृक्ष व वनस्पती औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर या जिल्ह्यामधील जंगलात सहज आढळून येतात. मात्र, प्रचंड प्रमाणात होणारे निर्वनीकरण, वाढती वृक्षतोड, औषधीसाठी वृक्ष प्रजातीचे अतिशोषण, दरवर्षी लागणारे वणवे यामुळे येथील जैवविविधता धोक्यात आली आहे.

पाडळ, कौशी, मोखा व बिजा ही झाडे अत्यंत दुर्मीळ झाली असल्याची बाब पर्यावरणप्रेमी व वनस्पती अभ्यासक असलेले जि.प. प्रा. शाळा चारठा येथील शिक्षक मिलिंद गिरधारी यांच्या लक्षात आले. भटकंतीमध्ये पाडळचे केवळ एकच झाड सापडले. तसेच हुंब (१), सफेद कुडा (२), कौशी(५), बिजा (१०) एवढीच आढळून आली आहेत. या झाडांच्या बिया संकलित करून त्याची रोपे बनवण्याचा ध्यास त्यांनी घेतला. गिरधारी, रोहित ठाकूर आणि प्रवीण मोगरे या तिघांनी एप्रिल-मे महिन्याच्या उन्हाची तमा न बाळगता अनेक प्रजातीच्या बिया गोळा केल्या. वनक्षेत्रातून झाडांच्या बिया जमा करण्यावर बंदी असल्याने या दुर्मीळ वृक्षांचे संवर्धन कार्यात अडथळा आला. पण यातील पाडळ, मोखा, कौशी हे दुर्मीळ वृक्ष विदर्भ व कोकणातील खाजगी क्षेत्रात असल्याने संबंधित शेतकऱ्यांना विनंती करून या बिया संकलित केल्या. कौशीच्या बिया रायगडच्या डाॅ. भावना जाधव व मनोज केळकर यांनी तर पाडळ या अत्यंत दुर्मीळ वृक्षाच्या बिया गोंदिया येथून धनलाल नेताम यांनी पाठवल्या .

या निसर्ग मित्रांनी एकत्र येऊन एक छोटेखानी रोपवाटिका उभारली असून यात अत्यंत दुर्मीळ पाडळ, मोखा, कौशी, बिजा, तिवस, मोई इ. रोपे तयार केली आहेत.

ही झाडे प्राणी-पक्षी-कीटकांची अन्न साखळी निर्माण करणारी आहेत. तसेच अशी रोपे वनविभागाने तयार करावी, जेणेकरून त्यांची जंगलामध्ये व्यापक प्रमाणात लागवड करून प्राणी-पक्षी-कीटकांची अन्न साखळी निर्माण होण्यास आणि जैवविविधता निर्माण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा निसर्गप्रेमी व्यक्त करीत आहेत.

Web Title: Padal, Mokha, Bija and Kaushi trees became rare in Marathwada!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.