पडेगाव, कांचनवाडी कचरा प्रक्रिया प्रकल्प दिवाळीनंतर सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 03:56 PM2020-11-14T15:56:23+5:302020-11-14T15:57:43+5:30
शहरात २०१८ मध्ये अभूतपूर्व कचराकोंडी निर्माण झाली होती.
औरंगाबाद : शहरात कचराकोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने चार ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. चिकलठाणा येथील प्रकल्प सुरू होऊन वर्ष उलटले तरी इतर तीन प्रकल्प रखडलेले होते. आता पडेगाव व कांचनवाडी प्रकल्प सुरू करण्यास दिवाळीनंतरचा मुहूर्त प्रशासनाने काढला आहे.
शहरात २०१८ मध्ये अभूतपूर्व कचराकोंडी निर्माण झाली होती. नारेगाव येथे कचरा टाकण्यास ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर नवी जागा शोधताना महापालिका व शासनाची दमछाक झाली. त्यामुळे शहरात हजारो टन कचरा पडून राहिला व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. त्यानंतर महापालिकेने धडा घेत कचऱ्याची साठवणूक न करता त्यावर प्रक्रिया करण्यासाठी चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल व कांचनवाडी येथे प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी १४८ कोटींच्या डीपीआरला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. एका वर्षात हे प्रकल्प सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, जागांचे वाद नागरिकांचा विरोध यामुळे चारही प्रकल्प रखडले.
गतवर्षी जून महिन्यात चिकलठाणा येथील प्रकल्प सुरू झाल्यामुळे महापालिकेला दिलासा मिळाला. हर्सूल येथील प्रकल्पाच्या जागेचा वाद अद्याप सुरू आहे. कांचनवाडी येथे हॉटेलमधून निघणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून गॅसनिर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प केवळ वीजजोडणी मिळत नसल्यामुळे आठ ते नऊ महिने ठप्प होता. आता वीजजोडणी मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. पडेगाव येथील प्रकल्पाला अद्याप विरोध सुरूच आहे. येथील कामदेखील अंतिम टप्प्यात असून, दिवाळीनंतर हे दोन्ही प्रकल्प सुरू होतील, असे घन कचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले.
हर्सूल येथील जागेची मोजणी
हर्सूल येथील प्रकल्प निविदेवरून वाद निर्माण झाल्याने रखडला होता. आता जागेवरून वाद पेटला आहे. परिसरातील शेतकरी या जागेवर दावा करीत काम थांबवीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने जागेची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोजणीनंतर प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे.