गंगाधर पानतावणे यांचा पद्मश्री पुरस्कार नातेवाईकांकडे सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 02:25 PM2018-06-27T14:25:58+5:302018-06-27T14:27:00+5:30
आज सकाळी विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर व जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या नातेवाईकांकडे हा पुरस्कार सन्मानपूर्वक सुपुर्द केला.
औरंगाबाद : पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दिवंगत डॉ. गंगाधर पानतावणे यांना प्रकृती अस्वस्थामुळे २१ मार्चला झालेल्या पद्मश्री पुरस्कार वितरण सोहळ्यास जाता आले नव्हते. त्यानंतर २७ मार्चला त्यांचे निधन झाले. यामुळे आज सकाळी विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर व जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे हा पुरस्कार सन्मानपूर्वक सुपुर्द केला.
अस्मितादर्श चळवळीचे जनक, ज्येष्ठ विचारवंत व लेखक डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या कार्याची दखल घेत शासनाने २५ जानेवारी २०१८ रोजी पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. पानतावणे यांना २१ मार्च २०१८ रोजी वितरीत करण्यात येणार होता. परंतु आजारपणामुळे पुरस्कार स्वीकारण्यासाठी डॉ.पानतावणे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर २७ मार्च रोजी त्यांचे निधन झाले. यामुळे आज सकाळी शासनातर्फे विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर व जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी हा पुरस्कार डॉ.पानतावणे यांच्या घरी जाऊन त्यांची कन्या कन्या नंदिता व निवेदिता यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी डॉ.पानतावणे यांचे कुटुंबीय मिलिंद अवसरमल, अमोल वाघमारे, एम.डी. बनकर, करुण भगत, प्रमोद खोब्रागडे, प्रा. लेखचंद मेश्राम, अजय आठवले व बंधु प्रभाकर पानतावणे यांची उपस्थिती होती. प्रशासनामार्फत उपजिल्हाधिकारी रीता मैत्रेवार, शिवाजी शिंदे, तहसीलदार श्री. शिंदे, अप्पर तहसीलदार रमेश मुंडलोड यांची उपस्थिती होती.