औरंगाबादेत पोलिस बंदोबस्तात 'पद्मावत' चित्रपट प्रदर्शित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 01:10 PM2018-01-25T13:10:31+5:302018-01-25T13:13:03+5:30
राजपूत समाज आणि राष्ट्रीय करणी सेनेसह विविध संघटनांनी बहुचर्चित 'पद्मावत' चित्रपटाला केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आज विविध मल्टीप्लेक्समध्ये पोलीस बंदोबस्तात सिनेमा प्रदर्शित झाला.
औरंगाबाद : राजपूत समाज आणि राष्ट्रीय करणी सेनेसह विविध संघटनांनी बहुचर्चित 'पद्मावत' चित्रपटाला केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आज विविध मल्टीप्लेक्समध्ये पोलीस बंदोबस्तात सिनेमा प्रदर्शित झाला.
शहरातील विविध सिनेमागृहात पदमावत सिनेमाचा पहिला शो पार पडला. या चित्रपटाला विरोध करणार्यांकडून सिनेमा प्रदर्शित होताच काही अनुचित प्रकार होऊ शकतो, हे लक्षात घेऊन खबरदारी म्हणून पोलिसांनी बुधवारपासूनच सिनेमागृहांना पोलीस सरंक्षण पुरविले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने शुक्रवारी देशातील सर्व सिनेमा गृहामध्ये पदमावत प्रदर्शित होत आहे. औरंगाबादेतीलकरणी सेनेने या चित्रपटाविरोधात पोलीस आयुक्तांना सोमवारी निवेदन दिले आणि बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केले. राणी पद्मीनी यांच्याविषयी आक्षेपार्ह दृश्य या सिनेमात दाखविण्यात आल्याचा आरोप करीत राजपूत समाजाने हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. अखिल भारतीय करणी सेनेने या चित्रपटाच्या विरोधात देशभर आंदोलन छेडले.मराठा समाजातील विविध संघटना, मुस्लीम विकास परिषद आणि ब्राम्हण समाज संघटनांनीही करणी सेनेला पाठिंबा दिला आहे. यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच शहर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली.
सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे याविषयी म्हणाले की, सिडको विभागामध्ये चार मल्टीप्लेक्स आहेत. प्रत्येक सिनेमागृहाच्या सुरक्षेसाठी दोन पोलीस निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक, २० कर्मचारी नियुक्त केले. याशिवाय काही लोक प्रेक्षक म्हणून थिएटरमध्ये जाऊन गोंधळ करू शकतात, ही बाब लक्षात घेऊन आम्ही साध्या वेशातील पोलीस थिएटरमध्येही तैनात केले आहेत.