कन्नड घाटात दरड कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:05 AM2021-09-02T04:05:02+5:302021-09-02T04:05:02+5:30
सात ते आठ ठिकाणी भूस्खलन : वाहनांच्या रांगा चार कि.मी.पर्यंत लागल्या कन्नड : सोलापूर-धुळे महामार्गावरील चाळीसगाव औट्रम घाटात ढगफुटी ...
सात ते आठ ठिकाणी भूस्खलन : वाहनांच्या रांगा चार कि.मी.पर्यंत लागल्या
कन्नड : सोलापूर-धुळे महामार्गावरील चाळीसगाव औट्रम घाटात ढगफुटी झाल्याने दरड कोसळली. तर डोंगरातून वाहणाऱ्या पाण्यामुळे आठ ते दहा ठिकाणी भूस्खलन होऊन रस्ता खचला आहे. यात एक ट्रक दरीत कोसळून ट्रकचालक ठार झाला असून एकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले दगड हटविण्याचे काम सुरू असून वाहतूक बंद असल्याने कन्नडकडे सुमारे चार किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती. ही वाहने शिऊर बंगला मार्गाने वळविण्याचे काम ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केले.
मंगळवारी पहाटे अडीच वाजता दरडी कोसळल्या. त्यामुळे घाटातील वाहने जागेवरच थांबली. दरड कोसळल्यानंतर डोंगरावरून पडणाऱ्या पाण्याबरोबर रस्त्यावर गाळ जमा झाला. रस्त्यावर सुमारे आठ ते दहा ठिकाणी चार फुटाच्या उंचीचा गाळ जमा झाला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे दहा ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
सकाळी ६ वाजता चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी मदतकार्य सुरू केले. जेसीबीच्या सहाय्याने सहा ठिकाणी रस्त्यावरील गाळ व दगड हटविण्यात आले असून सायंकाळी मदतकार्य थांबविण्यात आले आहे. अजूनही किमान तीन ते चार दिवस ही दरड दूर करून घाटातील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी लागतील असे महामार्ग पोलिसांचे म्हणणे आहे. सायंकाळी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसिलदार संजय वारकड, आ. उदयसिंग राजपूत यांनी दरड कोसळलेल्या ठिकाणी भेट देऊन घटनेची माहिती घेतली
ट्रक दरीत कोसळला : एक ठार, एक जखमी
दरम्यान, कन्नड घाटात एकाच रात्री तब्बल सात ते आठ दरडी कोसळत असताना त्याचवेळी एक ट्रकचालक घाटातून जात असताना ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक खोल दरीत कोसळला. या अपघातात एक जण ठार झाला तर, एक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पाऊस व भूस्खलन यामुळे मदत कार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे उशिरापर्यंत मृत व जखमी व्यक्तीचे नाव कळू शकले नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. वाहतूक पोलिसांनी दरडी कोसळल्याने पर्यायी मार्ग सांगितले आहेत.
चौकट...
पोलिसांनी सांगितला पर्यायी मार्ग
कन्नड घाटात खूप मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने नागरिकांनी कन्नड घाटाकडे येऊ नये. औरंगाबादला जायचे असल्यास नांदगाव मार्गाचा वापर करावा आणि औरंगाबादमधून बाहेर जायचे असल्यास जळगाव मार्गाचा वापर करण्याचे आवाहन महामार्ग सुरक्षा पथकाने केले आहे.
चौकट
तीन वर्षांनंतर पुन्हा घाट बंद
कन्नड : चाळीसगावच्या घाटात तीन वर्षांपूर्वीही भूस्खलन होऊन दरड कोसळली होती. त्यावेळीही शेकडो वाहने रस्त्यावर अडकली होती. यानंतर, घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तब्बल दीड महिना घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागला. यानंतर, आता पुन्हा दरड कोसळण्याची घटना घडली असून, आता घाट किती दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार, याबाबत कळू शकले नाही.
कोट...
आम्ही बेंगलोर येथून निघालेलो असून अहमदाबाद येथे जायचे आहे.
मी पहाटे चार वाजल्यापासून थांबलो होतो. मात्र, रस्ता सुरूच होत नाही, असे पोलिसांनी सांगितल्यानंतर पर्यायी मार्गाने जात आहे.
-सुखरामसिंग, ट्रकचालक, बेंगळूरू
कोट...
मी दोन दिवसांपूर्वी हैद्राबादहून सुरतला जाण्यासाठी निघालो आहे. पहाटे ३ वाजतापासून येथे अडकलो आहे. दरडी कोसळल्याने रस्ता बंद असल्याचे सकाळी समजले. मात्र रस्ता लवकर मोकळा होणार नाही, अशी माहिती मिळाल्याने पर्यायी मार्गाने जाण्यासाठी परत जात आहे.
- रितेश शहा, ट्रकचालक, सुरत