पैठण शहरास सलग दोन दिवस गूढ आवाजाचे हादरे; प्रशासनाने मौन बाळगल्याने नागरिक भयभीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 07:48 PM2023-04-15T19:48:38+5:302023-04-15T19:48:49+5:30
ढ आवाजाचा हादरा व तीव्रतेत सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पैठण: शहरात मंगळवारी ( दि ११) रोजीच्या गूढ आवाजाने बसलेल्या हादऱ्याची चर्चा ओसरत नाही तोच शुक्रवार व शनिवार असे सलग दोन दिवस पुन्हा गूढ आवाजाच्या दणक्याने शहर हादरले. विशेष म्हणजे, भूगर्भातून येणाऱ्या या गूढ आवाजाची तीव्रता शहराच्या दक्षिण भागास जास्त जाणवते असे अनुभवास आले आहे. गूढ आवाजाबाबत प्रशासनाने मौन धारण केल्याने जनतेच्या मनात भितीने घर केले आहे. प्रशासनाने या गूढ आवाजा बाबत खुलासा करावा अशी मागणी होत आहे.
पैठण शहर मंगळवारी दुपारी १.४७ वा जोरदार गुढ आवाजाने हादरले, यानंतर दि १४ रोजी सायंकाळी ६.०२ वा पुन्हा गूढ आवाजाचा दणका बसला. शनिवारी ४.१६ वा परत शक्तीशाली आवाजाचा दणका बसला. गूढ आवाजाच्या दणक्याने नागरीक भयभीत झाले आहेत. या अगोदर बसलेल्या भूगर्भातील गूढ आवाजाची नोंद जायकवाडी धरणावरील भूकंपमापण यंत्रावर झालेली नाही परंतु सध्या जायकवाडी धरणावरील भूकंपमापण यंत्र बंद असल्याने गेल्या पाच दिवसात झालेले गूढ आवाज व भूगर्भातील हालचालीची नोंद होणार नसल्याने सगळेच रामभरोसे सुरू आहे. सततच्या गूढ आवाजाने नागरीकांची भितीने गाळण उडालेली आहे.
आठ वर्षात ३५ गुढ आवाजाचे दणके
गेल्या ८ वर्षात आजचा ३५ वा गुढ आवाज होता. दरम्यान गूढ आवाजाचा हादरा व तीव्रतेत सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भुगर्भशास्त्रज्ञांनी गूढ आवाजाचा व भूगर्भातील हालचालीचा काही संबंध नाही असा अहवाल दिलेला आहे. शास्रज्ञांच्या म्हणण्यानुसार गूढ आवाज भूगर्भातील नाही हे मानले तर भूपृष्ठावर हा आवाज कोण कसा करतो याचाही तपास होणे गरजेचे आहे. परंतु, वारंवार असे धक्के बसत असताना जिल्हा प्रशासन मात्र मौन बाळगून आहे प्रशासनाकडून कसलाच खुलासा होत नसल्याने या आवाजाचे गूढ दिवसोंदिवस वाढतच चालले आहे.