वृद्ध कलावंत समितीत पैठण, गंगापूर व छत्रपती संभाजीनगरलाच स्थान!
By स. सो. खंडाळकर | Published: November 10, 2023 11:57 AM2023-11-10T11:57:46+5:302023-11-10T11:58:13+5:30
जिल्ह्यात नऊ तालुके असताना फक्त तीनच तालुक्यांना स्थान मिळण्यामागे काय उद्देश असू शकतो असा प्रश्न वृद्ध कलावंतांना पडला आहे.
- स. सो. खंडाळकर
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा वृद्ध कलावंत समितीवर छत्रपती संभाजीनगर, पैठण व गंगापूर या तीन तालुक्याव्यतिरिक्त अन्य तालुक्यांना स्थान मिळालेले नाही. समितीच्या अध्यक्षांसह एकूण दहा सदस्य आहेत. प्रत्येक तालुक्याला एक सदस्य दिला असता तरी नऊ तालुके समितीत समाविष्ट झाले असते. जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या सहीने नुकतीच ही कार्यकारिणी जाहीर झाली.
जिल्ह्यात नऊ तालुके असताना फक्त तीनच तालुक्यांना स्थान मिळण्यामागे काय उद्देश असू शकतो असा प्रश्न वृद्ध कलावंतांना पडला आहे. समितीच्या अध्यक्षपदी पैठणचे सदानंद मगर यांना नियुक्त करण्यात आले आहे. ते केकत जळगाव, ता. पैठणचे आहेत. नामदेव महाराज पोकळे हे सदस्य आहेत. ते आखातवाडा, ता. पैठणचे आहेत. शिवाजी शिंदे हे दरकवाडीचे आहेत. गंगापूर तालुक्याचे दौलतराव मनाळ, कडूबाळ गव्हांदे व गणेश कारभार यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरचे प्रेषित रुद्रावार, विश्वनाथ दाशरथे, मंगल श्यामराव साोळुंके, वशिष्ठ शिरसाट यांना स्थान देण्यात आले आहे.
दरम्यान, आपणास समितीवर घेण्याचे आश्वासन देऊनही घेण्यात आले नाही, असा आरोप करीत दिव्यांग कलावंत गजानन रेणुके यांनी १५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणावर बसणार असल्याचे जाहीर केले आहे. ते भारतीय दिव्यांग हक्क परिषदेचे शहराध्यक्ष आहेत. राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या मानधनासाठी या समितीतर्फे पात्र वृद्ध कलावंतांची निवड केली जाते. समितीचा कालावधी तीन वर्षांसाठी राहील. प्रत्येक तीन वर्षांनंतर समितीची पुनर्रचना करण्यात येते. मात्र समितीची पुनर्रचना होईपर्यंत अस्तित्वात असलेली समिती कार्यरत राहते. वृद्ध कलावंतांना मिळणारे मानधन पुरेसे नाही, ते वाढवण्यात यावे असा आग्रह गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.