पैठण डाव्या कालव्यातून सोडणार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:19 PM2017-11-14T23:19:53+5:302017-11-14T23:20:00+5:30
जायकवाडी डाव्या कालव्यातून रबी व उन्हाळी हंगामासाठी पाण्याच्या आठ पाळ्यांना मंजुरी मिळाली आहे
जालना/तीर्थपुरी : जायकवाडी डाव्या कालव्यातून रबी व उन्हाळी हंगामासाठी पाण्याच्या आठ पाळ्यांना मंजुरी मिळाली आहे. बुधवारपासून हे पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आ. राजेश टोपे यांनी दिली.
कालवा सल्लागार समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंजुरी दिली आहे. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी नाथसागरातून डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात येणार असल्याने ऊस लागवडीचा शेतक-यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
जायकवाडी पाटबंधारे अंतर्गत येणा-या पैठण नाथसागरात चांगला पाऊस झाल्याने शंभर टक्के धरण भरल्याने डाव्या कालव्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात पैठण, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, पाथरी, मानवत या तालुक्यांतील कारखाना कार्यक्षेत्रात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे. पाणी न सुटल्याने शेतक-यांनी ऊस लागवड थांबवली होती. पाणी कधी सुटणार, किती पाणी मिळणार असा प्रश्न शेतक-यांसमोर उभा होता. अखेर मुंबई येथे कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली १३ नोव्हेंबर मुंबईत झाली. यात रबी हंगाम १५ आॅक्टोबर २०१७ ते २८ फेब्रुवारी १८ पर्यंत असतो. त्यात ऊस, गहू, ज्वारी, कापूस यासाठी पाणीपाळ्या ४ मंजूर झाल्या तर उन्हाळी हंगाम १ मार्च २०१८ ते ३० जून २०१८ पर्यंत असतो. यासाठी ४ पाणीपाळ्या मंजूर झाल्या. अशा आठ पाणीपाळ्या मंजूर झाल्या असून, ऊस लागवडीसाठी डाव्या कालव्यातून १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे चाºया, लघु चाºया, व सर्व्हिस रोडची दुरुस्तीकामे करून घ्यावीत, अशा सूचना संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या आहेत. शेतक-यांनी रबी हंगामासाठी या पाण्याचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन आ.टोपे यांनी केले.