जलवाहिनीच्या खड्ड्याचा बळी! तान्ह्या मुलासह ३ मुलींच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 12:25 PM2023-01-20T12:25:37+5:302023-01-20T12:26:56+5:30
रस्त्याच्या बाजूने खोदलेल्या खड्ड्यात इतर एका वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे त्यांची दुचाकी पडली.
- सचिन लहाने
औरंगाबाद : तीन मुलींच्या पाठीवर १५ दिवसांपूर्वी मुलगा झाला. घरात सर्वत्र आनंदी आनंद असतानाच वडिलांचा नक्षत्रवाडी परिसरातील रस्त्याच्या कडेला खोदलेल्या समांतर वाहिनीच्या खड्ड्यांनी जीव घेतल्याची घटना बुधवारी रात्री १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आल्याची माहिती निरीक्षक देविदास गात यांनी दिली.
शेख मोबीन शेख इसाक (३२, रा. बिडकीन) असे मृताचे नाव आहे. मोबीन हे ट्रकवर चालक म्हणून काम करतात. बुधवारी रात्री ते औरंगाबादेत काम संपवून दुचाकीवर बिडकीनच्या दिशेने निघाले होते. नक्षत्रवाडी परिसरात गेल्यानंतर रस्त्याच्या बाजूने खोदलेल्या खड्ड्यात इतर एका वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे त्यांची दुचाकी पडली. हा खड्डा तब्बल २० फुटांपेक्षा अधिक खोल आहे. नागरिकांनी त्यांना बाहेर काढून घाटी रुग्णालयात नेले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मोबीन शेख यांना तीन मुलींच्या पाठीवर १५ दिवसांपूर्वी मुलगा झाला. या आनंदावर या घटनेमुळे विरजण पडले आहे.
पैठण रोड की मृत्यूचा सापळा?
औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या कडेला मागील अनेक महिन्यांपासून शहरातील समांतर जलवाहिनीचे काम सुरू आहे. जलवाहिनीचे पाइप टाकण्यासाठी २० ते २२ फूट खोल चारी खोदण्यात आली आहे. अगदी रस्त्याला खेटून असल्यामुळे त्यासाठी बॅरिकेटस् वगैरे काहीही लावलेले नाही. रात्रीच्या अंधारात या खड्ड्यात कोणतेही वाहन आत जाऊ शकते. शेख मोबीन यांची दुचाकीसुद्धा अशाच पद्धतीने खड्ड्यात कोसळली. त्यामुळे पैठण रस्ता हा वाहनचालकांच्या मृत्यूचा सापळाच बनल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.