अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीतून पैठण तालुक्याला वगळले; पालकमंत्री संदीपान भुमरे म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 02:17 PM2022-11-28T14:17:05+5:302022-11-28T14:17:35+5:30
पैठण तालुक्यासोबत वैजापूरला देखील वगळले; दुसऱ्या टप्प्यात मदत मिळणार असल्याचा शासनाचा दावा
औरंगाबाद : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुमारे २ लाख ८६ हजार शेतकऱ्यांच्या १ लाख ९२ हजार ९५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यांच्या भरपाईसाठी २६८ कोटी रुपयांची मदत शासनाने जाहीर केली असून, यात पैठण, वैजापूर तालुका व अप्पर तहसीलअंतर्गत येणाऱ्या नुकसानीचा समावेश नाही. या तालुक्यात सततच्या पावसामुळे नुकसान झाले असून, १५० कोटींहून अधिकचा मदतनिधी या तालुक्यांना जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीत तालुक्यांचा समावेश नसल्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे.
गेल्या आठवड्यात जिल्हा प्रशासनाने २६८ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्याबाबत तालुकानिहाय आदेश दिले आहेत. त्यामध्ये औरंगाबाद तालुक्यात ११ कोटी, फुलंब्रीत १२ कोटी, गंगापूर ५३ कोटी, खुलताबाद २१ कोटी, कन्नड ६३ कोटी, सिल्लोड ५५ कोटी, सोयगाव ४९ कोटी असा २६८ कोटींचा मदतनिधी वितरित करण्यात येणार आहे. दरम्यान, अन्नदाता शेतकरी संघटनेचे जयाजी सूर्यवंशी यांनी सांगितले की, पैठण तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांना मदत न करणे, विद्युतपंप बंद करणे हे ४ डिसेंबरपर्यंत थांबविले नाही तर जलसमाधी घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पालकमंत्री काय म्हणाले
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे नुकसानीचे दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात अतिवृष्टीचे नुकसान झालेल्या शेतकरी व क्षेत्रासाठी मदत देण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे पैठण, वैजापूर व अप्पर तहसीलअंतर्गत मदत जाहीर होणारच आहे. पैठण तालुक्यात ९५ कोटी मिळण्याची शक्यता आहे; तसेच वैजापूर व अप्पर तहसीलमध्येही मदत जाहीर होणार आहे. उगाच कुठल्याही गोष्टीचे राजकारण करण्यात काहीही अर्थ नाही.
- संदीपान भुमरे, पालकमंत्री