पैठण तालुक्यात ४५ हजार हेक्टरवरील पिकांना परतीच्या पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 03:06 PM2019-11-04T15:06:15+5:302019-11-04T15:13:32+5:30
तहसील प्रशासनाने पंचनामा करण्यासाठी प्रत्येक गावासाठी एक पथक तयार केले आहे
पैठण : परतीच्या पावसाने पैठण तालुक्यातील ४४९७८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून ६३०३४ ईतक्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तहसील प्रशासनाने पंचनामा करण्यासाठी प्रत्येक गावासाठी एक पथक तयार केले असून शेतकऱ्यांनी शेतात उपस्थित राहून नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत असे आवाहन पैठणचे प्रभारी तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी केले आहे.
पैठण तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने प्रामुख्याने शेतातील कापुस, सोयाबीन, बाजरी, मका व फळबागांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. तहसील प्रशासन व कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक नुकसान अंदाज अहवालात ४४९७८ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे म्हटले आहे. बाधित क्षेत्रापैकी ३६१२० हेक्टर क्षेत्र कापुस पिकाखालील आहे. सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असून जवळपास १२९० हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. फळबागांच्या बाधित क्षेत्राची आकडेवारी अद्याप आलेली नाही.
पैठण तालुक्यातील १९१ गावासाठी तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामसेवक अशा त्रीसदस्यीय पथकाची निर्मिती करण्यात आली असून पंचनाम्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी दिली. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला असेल अशा शेतकऱ्यांनी पंचनामा करतांना नोंद करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी केले आहे.
४० गावांचे पंचनामे पूर्ण......
पैठण तालुक्यात गतीने पंचनामे करण्यात येत असून ४० गावातील बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असल्याचे तहसीलदार भारस्कर यांनी सांगितले.