पैठणमध्ये आहे ज्ञानेश्वराने वेद वदवून घेतलेल्या रेड्याचे मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 07:31 PM2019-07-10T19:31:31+5:302019-07-10T19:35:14+5:30
ज्ञानेश्वराने रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि वेदांचे उच्चारण रेड्याच्या मुखातून होऊ लागले.
- प्रशांत तेलवाडकर
आपण देव-देवतांचे मंदिर पाहत असतो; पण पैठणमध्ये रेड्याचे मंदिर आहे. एवढेच नव्हे, तर भाविक रेड्याच्या मूर्तीची पूजाही करतात. कारण, हा रेडा काही साधासुधा नाही, संत ज्ञानेश्वराने या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या रेड्याने वेदांचे उच्चारण करण्यास सुरुवात केली. तोच हा रेडा त्या जागी छोटेशे मंदिर उभारण्यात आले आहे.
पैठण येथील सर्वात प्राचीन नागघाट होय. हा घाट सातवाहनकालापासून अस्तित्वात आहे. याची नागडोह म्हणून महानुभावांच्या साहित्यात नोंद आहे. याच नागघाटावर ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदविण्याचा चमत्कार दाखविला, असे सांगितल्या जाते की, संत निवृत्ती, ज्ञानदेव,सोपान-मुक्ताबाई ही भावंडे पैठणच्या अधिकारी मंडळीकडून शुद्धीपत्र घेण्यासाठी गेले होते. तेव्हा एक महाभाग ज्ञानेश्वरांना म्हणाला की, तू जिवाशिवाचे तत्त्वज्ञान सांगतोस मग रेड्याच्या मुखातून वेद म्हणवून दाखव. तेथून एक रेडा चालला होता. ज्ञानेश्वराने रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि वेदांचे उच्चारण रेड्याच्या मुखातून होऊ लागले. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांचे वय अवघे १२ वर्षांचे होते.
शके १२०९ इ.स.१२८७ च्या शुद्ध वसंत पंचमीला (शुक्रवारी) ही घटना घडली होती. ज्या ठिकाणी रेड्याने वेद म्हटले त्या नागघाटावरील त्या जागेवर छोटे मंदिर आहे. भिंतीवर छायाचित्र काढून तो प्रसंग दाखविण्यात आला आहे. खाली त्याची माहितीही देण्यात आली आहे. या घटनेला ७२५ वर्षे पूर्ण झाले तेव्हा नागघाट भक्त मंडळाने येथील दगडी रेड्याच्या मूर्तीचा महाभिषेकही केला होता. या घाटावर सिद्ध वरुण गणपतीचे मंदिर आहे. अहिल्याबाई होळकर यांनी या घाटाची पुनर्रचना केली, असे म्हणतात. शिवाय शके १७५६ मध्ये रघुनाथ नावाच्या मराठी सरदाराने या घाटास जोडूनच दुसरा घाट बांधला. नंतरच्या काळात पैठण येथे अनेक घाट बांधण्यात आले. पैठण येथे जाणारे भाविक नागघाटावर आवर्जून जातात व येथील सिद्धवरून गणपती मंदिराचे प्रथम दर्शन घेतात व नंतर रेड्याच्या मंदिरात जाऊन तिथेही दर्शन घेतात. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याची जबाबदारी पैठण येथील नगर परिषदेवर आहेच शिवाय पैठणकरासह सर्व भाविकांचेही कर्तव्य आहे.