ध्येय धोरणातच अडकले पैठणचे संतपीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:04 AM2021-03-13T04:04:42+5:302021-03-13T04:04:42+5:30
संजय जाधव पैठण : संतपीठाचा आध्यादेश १५ दिवसात काढून संतपीठ कार्यान्वित करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ...
संजय जाधव
पैठण : संतपीठाचा आध्यादेश १५ दिवसात काढून संतपीठ कार्यान्वित करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी १९ सप्टेंबर २०२० रोजी पैठणला केली होती. यानंतर सहा महिन्यांचा कालावधी लोटला. परंतु, संतपीठ आजपर्यंत काही सुरू झाले नाही. दुसरीकडे अर्थसंकल्पात संतपीठाला कोरे ठेवल्याने वारकरी संप्रदायात नाराजी पसरली आहे. गेल्या ४० वर्षांपासून रखडलेल्या संतपीठासाठी राज्यकर्तेच झुलवत असल्याची भावना वारकरी संप्रदायातून व्यक्त होत आहे.
संतपीठाच्या ४० वर्षांच्या कार्यकाळात यापूर्वी २०११ व २०१४ मध्ये पैठण येथील संतपीठातून अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा तत्कालीन मंत्र्यांनी संतपीठात नारळ फोडून केली होती. कालांतराने या घोषणा हवेत विरल्या. उच्च तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांनी पैठणला येत संतपीठाच्या इमारतीची सप्टेंबर २०२०मध्ये रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आमदार आंबादास दानवे यांच्यासह पाहणी करून जानेवारी २०२१ पासून संतपीठातून काही अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली होती. मंत्रिमंडळात पैठणचे संदीपान भुमरे हे कॅबिनेट मंत्री असल्याने खरच पैठणचे संतपीठ सुरू होईल, अशी भाबडी आशा वारकरी संप्रदायासह पैठणकरांना होती.
संतपीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत चालविण्यात येणार आहे. यासाठी लागणारा प्रशासकीय खर्च राज्य शासन विद्यापीठास देईल, असे सांगून मंत्री सामंत यांनी संतपीठ कार्यान्वित करण्यासाठी २२ कोटींची तरतूद करण्याचे घोषित केले होते. मात्र अर्थसंकल्पात संतपीठासाठी निधीची तरतूद न झाल्याने पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाच्या पदरी निराशा पडली.
---- संतपीठाचा ४० वर्षांचा प्रवास -------
संतपीठाची नेमकी संकल्पना राज्यकर्त्यांना समजलीच नाही, प्रत्येक बैठकीत नवा निर्णय घ्यायचा व विसरून जायचा असाच संतपीठाचा प्रवास ४० वर्षांपासून सुरू आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी ४२ कलमी कार्यक्रमांतर्गत हे संतपीठ उभारण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांनी २३ जानेवारी १९८१ रोजी घेतला होता. कै. बाळासाहेब भारदे यांच्या अध्यक्षतेखाली १२ जणांची समिती २३ मार्च १९८१ रोजी स्थापन करण्यात आली. (समितीतील ८ सदस्यांचा मृत्यू झाला आहे) पाटबंधारे विभागाने संत ज्ञानेश्वर उद्यानातील १७ एकर जमीन संतपीठ उभारण्यासाठी दिली आहे. १९९१-९२ च्या अर्थसंकल्पात संतपीठासाठी एक कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.
--- फक्त घोषणांचा पाऊस आणि भूमिपूजन सोहळे ----
४ नोव्हेंबर १९९८ रोजी मनोहर जोशी, कै. गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत संतपीठाच्या कामाचे भूमिपूजनसुद्धा झाले होते.
संतपीठाच्या इमारतीचे बांधकाम तब्बल १५ वर्षे रखडले, सहा हजार ९५८ चौ.फू. आकाराच्या या जमिनीवरील संतपीठाची इमारत तयार झाली. भव्य सभागृह, बैठक सभागृह, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, अद्ययावत ग्रंथालय, उपाहारगृह, टपाल कार्यालय, बँक, जलकुंभ आणि विद्युतव्यवस्था या इमारतीत करण्यात आली. यानंतर संतपीठाचा कारभार सांस्कृतिक विभागाकडे देण्यात आला.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने संतपीठाच्याकारभाराचे हस्तांतरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे केले. २ फेब्रुवारी २०११ रोजी संतपीठातील अभ्यासक्रम जून महिन्यापासून सुरू करण्याचे आदेश तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दिले होते. १३ फेब्रुवारी २०१४ रोजी संतपीठाच्या इमारतीचे उद्घाटन राज्याचे तत्कालीन सांस्कृतिकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते झाले. गतवर्षी तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संतपीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळावा म्हणून प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला होता. दरम्यान, आता पुन्हा संतपीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत कार्यान्वित होईल, असे विद्यमान शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घोषित केले आहे. याप्रमाणे गेल्या ४० वर्षांपासून संतपीठाचा प्रवास सुरू असून, संतपीठ प्रत्यक्षात सुरू झाल्याशिवाय काहीच खरे नाही अशी धारणा मात्र पैठणकरांची आता पक्की झाली आहे.
---- संतपीठाचा अभ्यासक्रम अजून ठरलेला नाही ----
संतपीठाचा अभ्यासक्रम व संतपीठाची रचना कशी असेल, याबाबत निश्चित धोरण आजपर्यंत ठरलेले नाही. केवळ या दोन बाबींमुळे संतपीठ आजतागायत कार्यान्वित होऊ शकले नाही, हे समोर आले आहे. अभ्यासक्रम ठरविण्यासाठी सांस्कृतिक विभागाने अनेक बैठका घेतल्या. वेळोवेळी समित्या स्थापन केल्या. अभ्यासक्रमाबाबत समिती सदस्यांत दुमत निर्माण झाले. मात्र, अभ्यासक्रम काही ठरला नाही. याबाबतीत बैठक घेणे एवढी औपचारिकता राज्य शासनाकडून होत आहे.