पालम तहसीलवर शेकापचा धडकला मोर्चा
By Admin | Published: November 15, 2014 11:43 PM2014-11-15T23:43:41+5:302014-11-15T23:55:28+5:30
पालम : शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला.
पालम : तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने राज्य खजिनदार भाई लक्ष्मणराव गोळेगावकर यांच्या नेतृत्वाखाली १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला.
पालम तालुक्यात पाऊस न पडल्याने खरिपाची पिके पूर्णत: वाया गेली आहेत. तर ओलावा नसल्याने रबीच्या पेरण्या झाल्याच नाहीत. शेतकरी निसर्गाच्या संकटात सापडला असून चिंताग्रस्त झाला आहे. जनावरांना चाऱ्याची सोय नाही. परंतु, याकडे शासकीय यंत्रणा लक्ष देत नसल्याने अडचणींचा डोंगर उभा टाकलेला आहे.
पालम तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शहरातील ममता विद्यालयातून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा शनिवार बाजार, फळा-फरकंडा रस्ता, नवा मोंढा व मुख्य चौक, बसस्थानक परिसर या मार्गाने तहसील कार्यालयावर नेण्यात आला.
कोरडा दुष्काळ जाहीर करावा, गोदावरी नदीच्या काठावर जनावरांसाठी छावण्या सुरू कराव्यात, रोजगार हमी योजनेच्या कामाची सुरुवात करावी, जनावरांसाठी चाऱ्याची सोय करण्याकरीता शेतकऱ्यांचा ऊस बाजार भावाने खरेदी करून आरक्षित करावा, पीक विमा लागू करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन मोर्चेकऱ्यांनी तहसीलदारांना दिले.
या मोर्चात राज्य खजिनदार भाई लक्ष्मणराव गोळेगावकर यांच्यासह काशिनाथराव जाधव, नवनाथ हत्तीअंबिरे, गोपीनाथ भोसले, राजेश ढवळे, मोतीराम चवरे, बंडू जाधव, विक्रम दिवटे, मोतीराम शिंदे, सीताराम पौळ, मुक्तार पठाण,संभाजी कानगुले, गोविंद शिंदे, पुरभाजी मुळे यांच्यासह पालम तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)