'पालकमंत्री म्हणजे जहांगिरी नाही'; अंबादास दानवेंचा भूमरेंवर हल्लाबोल, डीपीसी बैठकीत राडा
By विकास राऊत | Published: August 7, 2023 01:44 PM2023-08-07T13:44:56+5:302023-08-07T13:47:02+5:30
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी वाटपावरून राडा
छत्रपती संभाजीनगर: विधानसभा क्षेत्रासाठी विकास निधी कमी मिळाल्याचा आरोप कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी केल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या आजच्या बैठकीत ठाकरे गट आणि शिंदे गटात राडा झाला. विधानपरिषदचे विरोधी पक्ष नेते आ. अंबादास दानवे आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यात यावरून जोरदार खडाजंगी झाली. यामुळे बैठकीतील वातावरण चांगलेच तापले होते.
विकास निधी वाटपावरून जिल्हा नियोजन समितीची आजची बैठक वादळी ठरली. ठाकरे गटाचे कन्नड विधानसभेचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्या मतदारसंघासाठी पुरवणी मागणीत कमी निधी मिळाल्याचा आरोप केला. हाच मुद्दा उचलून धरत विरोधीपक्ष नेते आ. दानवे यांनी पालकमंत्री दानवे यांच्यावर टीका केली. पालकमंत्री म्हणजे काय जहांगीर नाही, असे म्हणत दानवे यांनी भुमरे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. यावर संतप्त झालेले पालकमंत्री भुमरे यांनी देखील, 'हो आमची जहांगिरी आहे, असे म्हणत प्रत्युत्तर दिले. यानंतर चिडलेले दानवे जागेवरून उभे राहिले. हातवारे करत त्यांनी भुमरे यांच्यावर आणखी टीका केली. यावेळी भूमरे यांच्या मदतीला मंत्री अब्दुल सत्तार धावून आले. आ. दानवे यांना पालकमंत्री भुमरे आणि मंत्री सत्तार यांनी तिथेच प्रत्युत्तर दिले. तिघांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने बैठकीतील वातावरण बदलून तणावाचे झाले.
छत्रपती संभाजीनगर: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा; विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यात निधी वाटपावरून शाब्दिक चकमक pic.twitter.com/nSP2DEx6N6
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) August 7, 2023