दत्त जन्मोत्सवानिमित्त पालखी मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 06:59 PM2018-12-22T18:59:39+5:302018-12-22T18:59:52+5:30
एकता मित्र मंडळतर्फे दत्त जयंतीनिमित्त शनिवारी टाळ-मृदुंग व सनई चौघड्याच्या गजरात दत्तांची पालखी मिरवणूक काढण्यात आली.
वाळूज महानगर : एकता मित्र मंडळतर्फे दत्त जयंतीनिमित्त शनिवारी टाळ-मृदुंग व सनई चौघड्याच्या गजरात दत्तांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. येथील दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
दत्त जयंतीनिमित्त येथील दत्त मंदिरात सुरु असलेल्या संगीत भागवत कथेची ह.भ.प. जयंत महाराज नांदेडकर यांच्या कथेने सांगता करण्यात आली. दरम्यान, शनिवारी पहाटे ५:३० वाजता विश्वास मोहिते, दिलीप कालेकर, बाळासाहेब रासकर यांच्या हस्ते अभिषेक करुन ६:३० वाजता भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.
सकाळी १० वाजता मंदिरापासून लोकमान्य चौक, महादेव मंदिर मार्गे टाळ-मृदुंग व सनई चौघड्याच्या गजरात दत्त पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिला-तरुणींनी भजन-किर्तन म्हणत पावली खेळण्याचा आनंद घेतला. बाळासाहेब पाथ्रीकर, रमेश गोडसे व वरद चिंचोळकर यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर दुपारी ४:३० वाजता भाविकांच्या उपस्थितीत दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडला.
त्यानंतर ह.भ.प. गोरक्षनाथ महाराज सोनवणे यांचे किर्तन झाले. सायंकाळी महाप्रसाद वाटपानंतर निरंजन ढाकरे यांच्या भारुडाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाळासाहेब रासकर, संजय कांबळे, सुमित सावंत, बाळासाहेब बोरुडे, दत्तात्रय भवर, नाना जावडे, शंकर श्रीनिवास, सुरेश गाडेकर आदींनी परिश्रम घेतले. वाळूज, रांजणगाव येथेही दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वाळूज येथील दत्त कॉलनी, शिवाजी नगर येथे दत्त जयंतीनिमित्त भजन, भागवत कथा, किर्तन आदी धार्मिक कार्यक्रम झाले. सायंकाळी ह.भ.प. शरद महाराज बनसोडे यांच्या किर्तनाचा कार्यक्रम झाला.
दर्शनासाठी भाविकांची गर्दी ..
दत्त मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी ६:३० वाजता मंदिर खुले झाल्यानंतर दत्ताला महिला भाविकांनी बुंदी आणि भाताचा नैवैद्य दाखवून मनोभावे दर्शन घेतले. भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.