औरंगाबादेत पालेभाज्या महागल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:08 AM2018-08-18T00:08:58+5:302018-08-18T00:10:08+5:30
गुरुवारी पडलेल्या संततधार पावसामुळे अनेक शेतकरी व मजूर शेतात जाऊ शकले नाहीत. परिणामी, आज बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक घटली होती. यामुळे पालेभाज्या दुप्पट भावात विकल्या गेल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गुरुवारी पडलेल्या संततधार पावसामुळे अनेक शेतकरी व मजूर शेतात जाऊ शकले नाहीत. परिणामी, आज बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक घटली होती. यामुळे पालेभाज्या दुप्पट भावात विकल्या गेल्या.
शहरात येणाऱ्या पालेभाज्या आसपासच्या ग्रामीण भागातून आणण्यात येतात. सायंकाळी शेतातून पालेभाज्या काढल्या जातात व पहाटेपर्यंत त्या जाधववाडीतील आडत बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. येथून विविध भागांतील भाजीमंडईमध्ये त्या विक्रीसाठी नेण्यात येतात. गुरुवारी सर्वदूर जोरदार पाऊस झाला. शेतात चिखल झाल्याने शेतकरी व मजूरही शेतात गेले नाहीत.
आज जाधववाडीतील पालेभाज्यांच्या आडत बाजाराला साप्ताहिक सुटी होती; मात्र आज सकाळी पाऊस उघडल्याने काही शेतकरी शेतात गेले व त्यांनी पालेभाज्या काढून आणल्या. चिकलठाणा येथील आठवडी बाजारात या पालेभाज्या कमी प्रमाणात विक्रीला आल्या होत्या. कोथिंबीर, पालक, शेपू १० रुपयांना दोन जुडी असा विकला जात होता. सारंगधर गादगे यांनी सांगितले की, मागच्या शुक्रवारी १० रुपयात पालेभाज्यांच्या चार जुड्या विकल्या होत्या. आज आवक कमी झाल्याने १० रुपयांना दोन जुड्या विकल्या जात आहेत, तर बारीक वांगे ३० रुपये किलोपर्यंत विकले जात होते. टोमॅटोपासून ते कारल्यापर्यंत सर्व फळभाज्यांचे भाव किलोमागे ५ रुपयांनी वाढले होते. आज आठवडी बाजारात नेहमीपेक्षा कमी पालेभाज्या व फळभाज्या विक्रेते दिसून आले. ज्यांच्याकडे भाज्या होत्या त्या १५ आॅगस्ट रोजी खरेदी केलेल्या भाज्या होत्या.
भाजीमंडईत वांगे ६० रुपये किलो
औरंगपुरा भाजीमंडईत तर सर्व प्रकारच्या पालेभाज्या १० रुपयास १ गड्डी विकल्या जात होत्या. यासंदर्भात विक्रेते सागर पुंड यांनी सांगितले की, पालेभाज्यांमध्येही ३० ते ४० टक्के पालेभाज्या खराब झाल्या होत्या. त्या फेकून द्याव्या लागल्या. बारीक वांगे ६० रुपये किलोपर्यंत विकल्या गेले. उद्या जाधववाडीतील अडत बाजार सुरू होईल, तसेच आज दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने उद्या शेतातील भाज्या विक्रीला येतील.