फॉक्सकॉनसाठी पालघरचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:13 AM2017-07-21T01:13:04+5:302017-07-21T01:15:09+5:30
औरंगाबाद : तैवानच्या फॉक्सकॉन या मोबाइल हार्डवेअर बनविणाऱ्या कंपनीने भारतात टप्प्याटप्प्याने ३२ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना आखली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : तैवानच्या फॉक्सकॉन या मोबाइल हार्डवेअर बनविणाऱ्या कंपनीने भारतात टप्प्याटप्प्याने ३२ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना आखली असून, महाराष्ट्रातील पालघर या नवनिर्मित जिल्ह्याचे नाव त्या कंपनीच्या गुंतवणुकीसाठी पुढे आले आहे. औरंगाबादच्या डीएमआयसीची चर्चा या उद्योग गुंतवणुकीसाठी झाली; परंतु आता पालघरचे नाव पुढे आल्यामुळे हा उद्योग येथे येण्याबाबत साशंकता आहे.
औरंगाबाद आणि पालघर अशा नावांचा क्रम उद्योग वर्तुळात चर्चेत असला तरी हा उद्योग नागपूरला नेण्याच्या राजकीय हालचाली होऊ शकतात, अशी चर्चा आहे. पालघर येथे २ हजार ७६६ हेक्टर जागा १९६० पासून संपादित करून ठेवलेली आहे. दुग्ध प्रकल्पासाठी असलेली ही जागा सरकारने ताब्यात घेतली होती; परंतु हा प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे मागास भागात उद्योग विकासासाठी फॅब धोरणांतर्गत फॉक्सकॉन हा उद्योग तिकडे जाण्याची दाट शक्यता आहे. शासनानेदेखील तसा प्रस्ताव संबंधित उद्योगाला दिल्याचे कळते.
राज्य शासनाने जास्तीचे भांडवली अनुदान देण्याचा अधिकार मंत्रिमंडळ उपसमितीला दिले आहेत. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक्स धोरण-२०१६ अंतर्गत फॅब प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न होणार आहेत. विदर्भ व मराठवाड्यासारखा भाग तुलनेने मागास राहिलेला आहे. त्या मागास भागामध्ये उद्योगांचा विकास होणे आवश्यक असून, त्यासाठी शासनाने धोरण आणले आहे. एका फॅब उत्पादक प्रकल्पासाठी सुमारे ६० हजार कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक अपेक्षित आहे.