मराठवाड्यात पीक नुकसानीचे ९० % पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 01:05 PM2019-11-11T13:05:13+5:302019-11-11T13:08:03+5:30
सुमारे ७ हजार गावांतील नुकसानीचे अहवाल तयार
औरंगाबाद : मराठवाड्यात आॅक्टोबरमध्ये पडलेल्या पावसामुळे झालेल्या शेती आणि पिकांच्या नुकसानीचे जवळपास ९० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. ८ हजार ४७९ गावांतील पिकांचे नुकसान झाले असून, आजपर्यंत सुमारे ७ हजार गावांतील पीक नुकसानीचे अहवाल तयार झाले आहेत. दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होऊन एकूण नुकसान किती झाले आहे, याचा प्रशासकीय आकडा समोर येईल.
९ लाख ६१ हजार २७७ हेक्टर क्षेत्र ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित झाले आहे. ३० लाख शेतकऱ्यांचे पंचनामे आजवर पूर्ण झाले आहेत. ३४ लाख १४ हजार ६६१ एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे. एकूण ३१ लाख ७२ हजार ४९७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १३५५ पैकी सुमारे १ हजार गावांतील पंचनामे पूर्ण झाले असून, ४ लाख ५२ हजार ९४८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ३ लाख ६० हजार शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. एकूण ४ लाख ८ हजार २७६ हेक्टरवरील पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. जालन्यातील ९६४ पैकी ८१० गावांतील ५ लाख १० हजार ६५८ पैकी ४ लाख ५० हजार शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत. परभणीतील ८४३ गावांतील पंचनामे अंतिम टप्प्यात आले आहेत. हिंगोलीतील ७०७ पैकी ६०० गावांतील २ लाख ४५ हजार ९१० पैकी दीड लाख शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील १५२५ पैकी १४०० गावांतील ५ लाख ८६ हजार २९९ पैकी ४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. बीड जिल्ह्यातील १४०२ पैकी १२०० गावांतील ५ लाख ६७ हजारपैकी साडेचार लाख शेतकऱ्यांचे पंचनामे आजवर झाले आहेत. लातूरमधील ९५१ पैकी ३६० गावांतील ३ लाख ७३ हजार ६६६ पैकी अडीच लाख शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, तर उस्मानाबादमधील ७३२ पैकी ६०० गावांतील पंचनामे पूर्ण झाले आहेत. ३ लाख ३९ हजार ४१८ पैकी अडीच लाख शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
पंचनाम्यानंतर समोर येईल आर्थिक नुकसान
मराठवाड्यातील सर्व पंचनामे पूर्ण झाल्यानंतर एकूण पेरणी, उत्पादकता आणि उत्पादन यावरून किती नुकसान झाले, याचा अंदाजे अहवाल तयार करण्यात येईल, असे विभागीय महसूल उपायुक्त पराग सोमण यांनी सांंगितले. ९० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील, असा दावाही सोमण यांनी केला.