औरंगाबादच्या कचर्यावर मुंबईतील बैठकीत पुन्हा पंचसूत्रीचे चिंतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:46 AM2018-03-22T11:46:26+5:302018-03-22T11:51:44+5:30
शहरातील कचर्याच्या विल्हेवाटीप्रकरणी चिंतन बैठका सुरूच असून, यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली.
औरंगाबाद : शहरातील कचर्याचा प्रश्न पंचसूत्री कार्यक्रमानुसार मार्गी लावण्याचे आदेश मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी बुधवारी दिले. ९ मार्च रोजी घोषित केलेल्या पंचसूत्रीच्या आधारावरच कचर्याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या. शहरातील कचर्याच्या विल्हेवाटीप्रकरणी चिंतन बैठका सुरूच असून, यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. बैठकीला नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदींची उपस्थिती होती.
कचरा समस्येबाबत लवकर मार्ग काढण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. त्या अनुंषगाने म्हैसकर यांनी औरंगाबादमध्ये येऊन प्रश्न सोडविण्यासाठी पंचसूत्री तयार केली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना वेळावेळी राज्य शासनामार्फत मार्गदर्शन करण्यात येत असून, शहरातील ९ विभागांसाठी ९ पथके तयार करण्यात आली आहेत. त्या माध्यमातून झोनमध्येच कचर्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. इंदौर येथे काम करणार्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची मदत कचर्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी घेण्यात येत असल्याचे म्हैसकर यांनी बैठकीत सांगितले. तर सध्या काही ठिकाणी कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी खत खड्डे तयार करण्याचे कामकाज सुरू असल्याचे नवल किशोर राम यांनी सांगितले.
मुख्य सचिवांचे आदेश असे
कचर्याचे वर्गीकरण करून त्यानुसारच कचर्याची विल्हेवाट लावणे, कचर्यावर विकेंद्रित पद्धतीने प्रक्रिया करणे, ओल्या कचर्यापासून खत निर्माण करणे, सुका कचरा जमा करण्यासाठी प्रत्येक प्रभागात केंद्र सुरू करणे, यापुढे कचर्याचे कुठेही डम्पिंग होणार नाही, याची काळजी घेऊन त्या पंचसूत्रीनुसार औरंगाबादमधील कचर्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश मुख्य सचिवांनी दिले.