विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची लसीअभावी पंचाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:05 AM2021-05-20T04:05:46+5:302021-05-20T04:05:46+5:30

औरंगाबाद : केंद्र शासनाकडून राज्य शासनाला लसीच्या मुबलक मात्रा प्राप्त होत नसल्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद करण्यात ...

Panchayat for lack of vaccine for students going abroad for education | विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची लसीअभावी पंचाईत

विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची लसीअभावी पंचाईत

googlenewsNext

औरंगाबाद : केंद्र शासनाकडून राज्य शासनाला लसीच्या मुबलक मात्रा प्राप्त होत नसल्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद करण्यात आले आहे. विदेशात शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची यामुळे कोंडी झाली आहे. लस घेतल्याशिवाय अमेरिकेसह इतर देशांमध्ये प्रवेश नाकारण्यात येत आहे. राज्य शासनाने विशेष बाब म्हणून विद्यार्थ्यांना लस द्यावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांची आहे.

मे ते जून महिन्यात भारतातून मोठ्या संख्येने विद्यार्थी विदेशात शिक्षणासाठी जातात. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी अमेरिका आणि इतर देशांमध्ये शिक्षणासाठी जाण्यासाठी सज्ज आहेत. शहरातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केली. अमेरिकन शासनाने लस घेतल्याशिवाय येता येणार नाही, अशी अट टाकली आहे. अन्न व औषध प्रशासनाने प्रमाणित केलेली लस हवी. लसीचा पहिला आणि दुसरा डोस पूर्ण केलेला असावा. १ मेपासून महाराष्ट्र शासनाने कोविन ॲपवर नोंदणी केलेल्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात केली होती. मागील काही दिवसांपासून शासनाने लसीकरणच बंद करून टाकले. त्यामुळे विद्यार्थी संकटात सापडले आहेत. काही विद्यार्थी आणि पालकांनी राज्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले आहे. मात्र, अद्याप शासनाकडून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

कोविन ॲप कधी सुरू होणार? विद्यार्थ्यांचे लसीकरण कधीपासून सुरू होईल? महापालिका आपल्या स्तरावर लक्ष देऊ शकते का? असे अनेक प्रश्न पालक-विद्यार्थी महापालिकेच्या वॉर रूमकडे करीत आहेत. महाराष्ट्र शासनाकडून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यासाठी पुढील कोणतेही आदेश आलेले नाहीत. लसीचा साठाही प्राप्त झालेला नाही, असे सांगण्यात येत असल्याचे वॉर रूम प्रमुख डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले.

Web Title: Panchayat for lack of vaccine for students going abroad for education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.