फुलंब्रीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत पंचायत समिती लिपिक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 05:36 PM2018-10-13T17:36:57+5:302018-10-13T17:37:57+5:30
फुलंब्री जवळ निल्लोड फाट्याजवळ झालेल्या दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.
औरंगाबाद : फुलंब्री जवळ निल्लोड फाट्यावर झालेल्या दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. सुरेश बाबुराव कुदळ ( 45 ,रा. रजाळवाडी ता. सिल्लोड ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे असून अपघातात एकजण गंभीर जखमी आहे.
सुरेश कुदळ हे फुलंब्री पंचायत समितीत लिपिक पदावर कार्य करायचे. शुक्रवारी ते कार्यालयातून आपल्या दुचाकीवरून (क्र. एम एच 20 डीआर 5669) सिल्लोड कडे परतत होते. औरंगाबाद, जळगाव राज्य मार्गावरील निल्लोड फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये कुदळ व रमेश सदाशिव कड हे दोघे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच नागरिक व पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारा दरम्यान कुदळ यांचा मृत्यू झाला. या घटनेची वडोदबाजार पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक नारायण घुगे, पो.काॅ. संतोष डोंगरे पुढील तपास करीत आहे.
सुरेश कुदळ हे फुलंब्री पंचायत समितीत साधारणपणे पाच वर्षापासून कार्यरत होते. त्यांनी काही काळ आस्थापना विभागातही काम केले . त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वांना परिचित होते. त्यांच्या अकस्मीक निधनाने रजाळवाडीसह फुलंब्री पंचायत समितीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.