नुकसानीचे काही ठिकाणीच पंचनामे; प्रतीक्षा सर्वत्रच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 05:52 PM2019-11-01T17:52:40+5:302019-11-01T17:54:24+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या तोंडी सूचनेनुसार काही ठिकाणी पंचनामे
औरंगाबाद : परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याबाबत शासनाकडून अद्यापही अध्यादेश जारी झालेला नाही. शेतकऱ्यांचा आक्रोश लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या तोंडी सूचनेनुसार आता सिल्लोड, सोयगाव हे दोन तालुके सोडले, तर कन्नड, खुलताबाद, गंगापूर व फुलंब्री या तालुक्यांमध्ये पंचनाम्याला अद्यापही सुरुवात झालेली नाही.
अगोदरच दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या जखमांवर परतीच्या पावसाचे चटके सहन करीत यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उसनवारी, कर्ज घेऊन कपाशी, मका, बाजरी, सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी आदी खरिपाची पिके जगविली. मात्र, ऐन काढणी सुरू असतानाच बघता बघता हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिसकावून नेला. जिल्ह्यात लाखो हेक्टरवरील पिकांची अक्षरश: माती झाली.
प्रामुख्याने सिल्लोड, सोयगाव, कन्नड, खुलताबाद, फुुलंब्री या चार तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने खरिपाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. तब्बल पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे काढणी करून ठेवलेली मका, बाजरीची कणसे पाण्यावर तरंगू लागली आहेत. अनेक ठिकाणी मका व बाजरीच्या कणसाला कोंब फुटले. पावसाची तीव्रता एवढी होती की, शेताला तळ्याचे स्वरूप आले. काही ठिकाणी कपाशीच्या बोंडातून कोंब बाहेर निघाले आहेत. सोयाबीन, ज्वारी, कापूस आडवे झाले आहेत. साधारणपणे १८ आॅक्टोबरपासून काही मंडळांमध्ये संततधार, तर काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. डोळ्यासमोर पिकांचे झालेले नुकसान पाहून दोन हतबल शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यंदा दिवाळीच्या दिवसांतच शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने दिवाळे काढले.
निवडणूक संपल्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे केले जातील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; परंतु शासनाकडून नुकसानभरपाईसंबंधी अजूनही पावले उचलली नाहीत. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या तोंडी सूचनेनुसार प्रशासनाकडून पंचनाम्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्येही ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे व ज्यांनी काढलेला नाही, अशी वर्गवारी करून पंचनामे केले जात आहेत. पंचनाम्यासाठी संयुक्त पथके तैनात करण्यात आली असून, त्यामध्ये कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांचा समावेश आहे. यामध्ये काही ठिकाणी विमा कंपनीचे प्रतिनिधीदेखील सहभागी आहेत. असे असले तरी अजूनही सिल्लोड, सोयगाव हे दोन तालुके सोडले, तर अन्य तालुक्यांमध्ये पंचनाम्याला सुरुवात झालेली नाही.
अहवाल सादर
सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टी व संततधार पावसामुळे ८१ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. कन्नड तालुक्यात ८८ हजार ८९९ हेक्टरपैकी ७३ हजार ३१८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. फुलंब्री तालुक्यात २२ हजार हेक्टरपैकी १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील मका वाया गेला. सोयगाव तालुक्यात ४१ हजार १५० हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.