प्रभारी प्रशासकांनी हाताळलेल्या संचिकांचे पांडेय यांनी केले अवलोकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:07 AM2021-01-08T04:07:07+5:302021-01-08T04:07:07+5:30
एकमेकांच्या निर्णयाचे अवलोकन महापालिका : औरंगाबाद : महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय १० दिवस सुट्टीवर होते. त्यांच्या अनुपस्थित राज्य ...
एकमेकांच्या निर्णयाचे अवलोकन
महापालिका :
औरंगाबाद : महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय १० दिवस सुट्टीवर होते. त्यांच्या अनुपस्थित राज्य शासनाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. प्रभारी प्रशासक यांनी कोणकोणत्या संचिका हाताळल्या, त्यामध्ये त्यांनी काय शेरा मारला आहे, याचे अवलोकन प्रशासक पांडेय यांनी मंगळवारी केले.
प्रभारी प्रशासक १० दिवसांमध्ये दोन वेळेस महापालिकेत आले. जिल्हाधिकारी कार्यालयातच बसून ते महापालिकेचा व्याप सांभाळत होते. अत्यावश्यक संचिका मंजुरीसाठी आणाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी आणि मनपा प्रशासनाला दिले होते. आठ ते दहा महत्त्वाच्या संचिका त्यांनी हाताळल्या होत्या. महापालिका प्रशासक पांडेय यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. मंगळवारी त्यांनी सर्व संचिका आपल्या कक्षात मागून घेतल्या. प्रत्येक संचिकेवर प्रभारी प्रशासकांनी कोणता शेरा मारला आहे याचे अवलोकन केले. काही संचिकावर व्हीजट, बजेट आहे का? चर्चा, असे वेगवेगळ्या पद्धतीचे शेरे मारण्यात आले होते. प्रभारी प्रशासक यांनी ज्या संचिकावर स्थळ पाहणी लिहिली आहे, तेथे पाण्डेय पाहणी करणार आहेत.
पांडेय यांनी मंगळवारी सकाळी मागील दहा दिवसांमध्ये कोणकोणत्या संचिका मंजूर करण्यात आल्या त्या समोर आणाव्यात, असे निर्देश दिले. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. प्रशासक यांनी दुपारी सर्व संचिका संबंधित विभागांकडे पाठवून दिल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.