पांढरीच्या जि. प. शाळेचे पालटले रुपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:06 AM2021-03-13T04:06:36+5:302021-03-13T04:06:36+5:30
औरंगाबाद : पांढरी पिंपळगावच्या दोन जीर्ण खोल्यांच्या शाळेने शाळा आता कात टकली आहे. रंगरंगोटी, सजावट आणि बोलक्या भिंती ...
औरंगाबाद : पांढरी पिंपळगावच्या दोन जीर्ण खोल्यांच्या शाळेने शाळा आता कात टकली आहे. रंगरंगोटी, सजावट आणि बोलक्या भिंती विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनाही आकर्षित करत आहे. त्यामुळे ३० विद्यार्थीही वाढले आहेत. ही किमया नभांगण फाऊंडेशनच्या सहकार्यांने साध्य झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या पांढरी पिंपळगाव या शाळेसाठी केलेल्या कामाची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले आणि फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पाहणी करत येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गावकरी आणि शिक्षकांच्या सहभागाचे कौतुक केले.
बेंबळा नदीचे पुनरूज्जीवन त्यानंतर लोकसहभागातून २०० स्वच्छतागृह, शाळा कायापालट करण्याचे काम नभांगणने हाती घेतले. पूर्वी दोन पडिक वर्ग होते. आता पाच वर्ग, स्टाफ रूम, एक स्वतंत्र किचन रूम, दोन स्वच्छतागृह आणि मैदान विकसित केले. पूर्वीची ६० विद्यार्थीसंख्या वाढून ९१ वर पोहोचली आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली. यावेळी शालिनी मौर्या, प्रवीण अस्वले, विस्तार अधिकारी रमेश ठाकूर, केंद्रप्रमुख किरण जाधव, मंदा पवार, दीपाली चौरे, सरपंच दीपक मोरे, योगेश कल्लोरे, संजय मोरे, शिवाजी कल्लोरे, बाळू मोरे, बाळासाहेब मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
चौकट..
मला कलेक्टर व्हायचंय...
या शाळेतील सहावीतील मुक्ता मोरे या विद्यार्थिनीला डॉ. गोंदावले यांनी इंग्रजीत प्रश्न विचारला. त्याचे खाडखाड उत्तर तिने दिले. तुला काय व्हायचंय असे विचारल्यावर तिने मला कलेक्टर व्हायचंय म्हटल्यावर तिच्या उत्तराने भारावलेल्या डाॅ. गोंदावले यांनी तिला पाचशे रुपयांची बक्षीस देत कौतुकाची थाप दिली. ही नक्कीच दर्जेदार शाळा म्हणून समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चौकट
आता तज्ज्ञांकडून दर्जेदार
तंत्रज्ञान, शिक्षणासाठी प्रयत्न
विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भाषा, विज्ञान, तंत्रज्ञान शिकवू इच्छित व्यक्तींनी पुढाकार घेऊन ऑनलाईन किंवा ऑफलाईन कार्यशाळा, आठवड्यातून दोनवेळा प्रत्यक्ष किंवा चर्चासत्र आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
राजश्री देशपांडे, अध्यक्षा, नभांगण फाउंडेशन.