पंढरीची वारी, यंदाही घरूनच साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:05 AM2021-07-08T04:05:12+5:302021-07-08T04:05:12+5:30
जयेश निरपळ गंगापूर : वारी म्हणजे महाराष्ट्राचं मोठं सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक वैभव आहे. दरवर्षी ज्येष्ठ-आषाढ महिन्यात वारकरी मनाला वेध ...
जयेश निरपळ
गंगापूर : वारी म्हणजे महाराष्ट्राचं मोठं सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक वैभव आहे. दरवर्षी ज्येष्ठ-आषाढ महिन्यात वारकरी मनाला वेध लागतात ते पंढरपूरच्या वारीचे. परंतु कोरोना महामामारीमुळे शेकडो वर्षांची परंपरा असलेली वारी खंडित झाली असून सलग दुसऱ्या वर्षी पांडुरंगाचे दर्शन होणार नसल्याने तालुक्यातील वारकरी निराश झाले आहेत. वारकरी प्रत्येक वर्षी दिंडीची आतुरतेने वाट पाहत असतो.
घोंगटा, राहुटीसह इतर आवश्यक साहित्याची जुळवाजुळव अनेक दिवसांआधीच मोठ्या उत्साहात वारकरी करीत असतात. भजन, प्रवचन, कीर्तन, रिंगण, फुगडी पावसामुळे निर्माण झालेला मृदगंध आदींच्या साक्षीनं हा सोहळा फुलतो. पंढरीची वारी म्हणजे वारकऱ्यांची दिवाळीच. येथील विठ्ठल आश्रम, देवगड संस्थान, रामगड, सरला बेट व आदी दिंड्यांमार्फत तालुक्यातील साधारणपणे सात ते आठ हजार वारकरी दरवर्षी ‘पंढरीचा वारकरी ! वारी चुको न दे हरी !’ या तुकोबांच्या अभंगाप्रमाणे पंढरपूरची वाट धरतात. यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश असतो. विशेष म्हणजे या दिंड्यांचा उल्लेख महाराष्ट्रातील मानाच्या दिंड्यामध्ये होतो. वारीसाठी विशेष नियम करून दिंड्यांना मान्यता द्यायला हवी होती, असं काहींच मत आहे.
--
कोरोनाचा प्रादुर्भावदेखील कमी झाला असून वारीसाठी विशेष नियम तयार करून दिंड्यांना मान्यता द्यायला हवी होती. जेणे करून वारकऱ्यांचा हिरमोड झाला नसता. - हभप रामभाऊ महाराज राऊत, दिंडी प्रमुख, विठ्ठल आश्रम.
शासनाने अतिशय विचारपूर्वक निर्णय घेतला असून यामध्ये वारकऱ्यांचे हित आहे. या निर्णयाचा आम्ही आदर करतो. सध्याच्या नैसर्गिक संकटात गरजवंताला मदत करून खऱ्या अर्थाने विठ्ठल भक्तीचा आंनद घेता येऊ शकतो. - प्रा. गिरजीनाथ जाधव, प्रसिद्धी प्रमुख, अ. भा. वा. परिषद.