Pandharpur wari 2018: नाथांच्या पालखीला ४०० वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:29 AM2018-07-05T00:29:37+5:302018-07-05T00:30:37+5:30

आज सायंकाळी पैठणहून प्रस्थान : सोयी-सुविधा नसल्याने पालखी मार्गाची वाट बिकट

Pandharpur wari 2018: 400 years old tradition of sant ekanatha Palkhi | Pandharpur wari 2018: नाथांच्या पालखीला ४०० वर्षांची परंपरा

Pandharpur wari 2018: नाथांच्या पालखीला ४०० वर्षांची परंपरा

googlenewsNext

संजय जाधव
पैठण : वारकरी संप्रदायास भागवतरूपी खांब देणारे व संप्रदाय समतेची, बंधुतेची पताका सदैव फडकवत ठेवणारे संत म्हणजे शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज होय. ‘बये दार उघड’ म्हणत शोषित व पिचलेल्या मनात संघर्षाची ठिणगी टाकून त्यांना जागरूक करणाऱ्या संत एकनाथ महाराजांची विचारधारा समस्त वारकºयांनी आजही तेवत ठेवली आहे. सुमारे ४०० वर्षांपासून सुरू असलेल्या आषाढीच्या पंढरपूर वारीसाठी मराठवाडाभरातून वारकरी नाथांच्या पैठणनगरीत जमा होतात व तेथून पुढे आनंदाने ‘भानुदास एकनाथ’ असा जयघोष करीत विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने पालखीसोबत दरमजल करीत रवाना होतात. ५ जुलै रोजी सायंकाळी पैठणनगरीतून पालखीचे मोठ्या उत्साहात प्रस्थान होणार आहे. वारकºयांनी मोठ्या संख्येने पालखीत सहभागी व्हावे, असे आवाहन नाथांच्या पालखीचे प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांनी केले आहे.
वारीची परंपरा
पैठण ते पंढरपूर या पालखी सोहळ्यास ४०० वर्षांचा इतिहास आहे. संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा संत भानुदास महाराज हे विठ्ठलभक्त होते. ते नियमित पैठण ते पंढरपूर आषाढी वारी करायचे. त्यांच्यानंतर एकनाथ महाराज यांच्यापर्यंत पंढरपूर वारी सर्वांनी केली.
नाथांच्या पादुकांची वारी
संत एकनाथ महाराजानंतर त्यांचे पुत्र हरिपंडित महाराज यांनी पंढरपूर वारीसाठी संत एकनाथ महाराज यांच्या पादुका घेऊन जाण्याची प्रथा सुरू केली. ती आजतागायत सुरू आहे. हरिपंडित महाराजांना ही प्रथा खंडित होऊ नये म्हणून निजाम राजवटीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. एका वारीला तर नाथ महाराजांच्या पादुका गुपचूप नेण्याचा प्रसंग हरिपंडित महाराजांवर ओढवला होता. निजामाच्या शिपायांच्या लक्षात येऊ नये म्हणून त्यांनी पादुका डोक्यावर ठेवून त्यावर फेटा बांधून निजामाची हद्द पार केली; परंतु वारी खंडित होऊ दिली नाही, असे ज्येष्ठ नाथवंशज ह.भ.प. रावसाहेब महाराज गोसावी यांनी सांगितले.
प्रस्थान त्रयी म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यास मान आहे. महाराष्ट्रभरातील वारकरी सोयीप्रमाणे या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूरकडे पायी रवाना होतात. मात्र, संत एकनाथ महाराजांच्या पालखीत सहभागी होणाºया वारकºयांना सोयी-सुविधा व चांगला मार्ग कधीच मिळाला नाही. केवळ पांडुरंगाच्या श्रद्धेच्या बलावर वारी अखंड सुरू आहे.
आषाढीला विठ्ठल मंदिरात गोपालकाला
संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा भानुदास महाराज यांनी कर्नाटकच्या अनागोंदीच्या राजाकडून पंढरपूर येथील मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती परत आणून तिची प्राणप्रतिष्ठा केली. भानुदास महाराजांची विठ्ठल मंदिरात समाधी आहे व याचमुळे नाथ महाराजांच्या पालखीस आषाढीला विठ्ठल मंदिरात गोपालकाला करण्याचा मान मिळालेला आहे. शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू असल्याचे ज्येष्ठ नाथवंशज ह.भ.प. रावसाहेब महाराज, हरिपंडित महाराज, पुष्कर महाराज, योगिराज महाराजांनी सांगितले.
पालखीची वाट बिकट
संत एकनाथ महाराज यांच्या पालखीस औरंगाबाद, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर या पाच जिल्ह्यांतून जवळपास २५० कि.मी. अंतर पायी कापावे लागते. यादरम्यान अनेक ठिकाणी कच्चे रस्तेसुद्धा उपलब्ध नाहीत. शेतातून पायवाटेने डोंगरातून चिखलातून, नदी-नाल्यांतून व दगडगोट्यांतून त्रास सहन करीत वारकºयांना पायी चालावे लागते. यात वृद्ध वयस्कर वारकरी, महिला व पुरुषांचे मोठे हाल होतात.
बीड जिल्ह्यात भाविकांना
ओढावा लागतो पालखी रथ
बीड जिल्ह्यात धनगरवाडी, हाटकरवाडी, गारमाथा हा अत्यंत डोंगराळ भाग असून, याठिकाणी साधा रस्तासुद्धा उपलब्ध नसल्याने डोंगरातील पायवाटेने पालखी रथ ग्रामस्थ व वारकºयांना हाताने ४ कि.मी.पर्यंत ओढावा लागतो, तर पावसामुळे नदी-नाल्यास पूर आल्यास तो ओसरेपर्यंत वाट पाहावी लागते.
पैठण येथून चनकवाडी येथे जाताना गोदावरी नदीवर पूल बांधावा, पाटेगाव-दादेगाव हा पालखी महामार्गातून सुटलेला रस्ता पालखी मार्गात समाविष्ट करावा, अशी वारकºयांनी मागणी केली आहे.
लाडजळगाव ते शेकटा, भगवानगड ते मालेगाव, मिडसावंगी ते मुंगूसवाड, राक्षसभुवन ते रायमोह, खर्डा ते तिंत्रज, एकबुर्जी नांगरडोह, रत्नपूर, अनाळे मुंगशी, बीटरगाव, सोलापूर जिल्ह्यात कव्हे ते कव्हेदंड, गवलेवाडी, कुर्डू, कुर्मदास, अरण, करकंब यादरम्यानचा रस्ता खूपच खराब व वेदनादायी आहे, असे पालखीप्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले यांनी सांगितले.
नाथांच्या पालखीबाबत शासन उदासीन
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत एकनाथ महाराज यांच्या पालखीस प्रस्थान त्रयी म्हणून ओळखले जाते. आळंदी, देहू व पैठण येथून या पालख्या निघतात. दरम्यान, आळंदी व देहू येथून निघणाºया पालखीस राज्य शासन विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देते. या उलट संत एकनाथ महाराजांच्या पालखीस मूलभूत सोयी-सुविधांसाठी प्रशासनाकडे झगडावे लागत आहे. आरोग्य, पोलीस बंदोबस्त, मुक्कामासाठी जागा, पाण्याच्या टँकरपासून ते पालखीसोबतच्या दिंड्यांना पंढरपूर प्रवेशास लागणाºया पाससाठी संघर्ष करावा लागतो. ग्रामीण भागातून निघणारा व ग्रामीण भागातून जाणारी संत एकनाथ महाराज यांची एकमेव पालखी असून, या पालखीस सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन उदासीन असल्याचा आरोप वारकºयांनी केला आहे.

Web Title: Pandharpur wari 2018: 400 years old tradition of sant ekanatha Palkhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.