पंढरीची वारी.. सामाजिकता आणि संस्कृतीचे अधिष्ठान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 04:21 PM2019-07-10T16:21:17+5:302019-07-10T16:28:51+5:30
महाराष्ट्राचा हा सामाजिक आणि सांस्कृतिक मानबिंदू अगदी परदेशातील अभ्यासकांनाही हरखून टाकणारा ठरतो
- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : ‘पंढरीच्या वाटे, वाट लागली चिखलाची.. वाट लागली चिखलाची, संग सोबत विठ्ठलाची’ अशा ओळी गुणगुणत आणि टाळ- चिपळ्यांच्या नादात निघालेल्या दिंडीतील प्रत्येकाला ओढ लागते ती विठ्ठलाच्या दर्शनाची. सातशे वर्षांहूनही अधिक दीर्घ परंपरा असलेली पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिकतेसोबतच मराठी संस्कृतीचे, विविध कलागुणांचे जणू अधिष्ठान आहे.
भजन, कीर्तन, ठिकठिकाणी होणारे प्रवचन, पावलीचा खेळ, विविध वाद्यांची साथसंगत यामुळे दिंडीचा हा सोहळा अद्भुत ठरतो. दिंडी ऐन भरात आल्यावर होणारा रिंगण सोहळा तर भल्याभल्यांना अचंबित करणारा आहे. महाराष्ट्राचा हा सामाजिक आणि सांस्कृतिक मानबिंदू अगदी परदेशातील अभ्यासकांनाही हरखून टाकणारा ठरतो आणि दिवसेंदिवस भाविकांचा दिंडीमध्ये वाढत जाणारा सहभाग वारीमध्ये असे काय रहस्य आहे, हे शोधायला प्रवृत्त करतो.
वारीचे दिवस जवळ येताच टाळ- चिपळ्या, मृदंग, पखवाज, पेटी आणि अशी बरीच एरव्ही कापडात गुंडाळून माळ्यावर ठेवून दिलेली चर्मवाद्ये, तंतूवाद्ये दुरुस्तीसाठी बाहेर येऊ लागतात. काही भजने नव्याने रचली जातात. विस्मरणात गेलेल्या अभंगांना उजाळा दिला जातो. या सगळ्या सांस्कृतिक दृष्टिकोनातून चाललेल्या हालचाली पाहिल्या की, पहिल्या पावसाच्या सरीसोबत दिंडीचा आधार घेऊन जणू सांस्कृतिकतेचे बीज नव्याने रोवले जात आहे की काय, असे वाटते. पंढरीची ही वारी आता के वळ कष्टकरी बांधवांपुरती आणि वारकरी संप्रदायापुरती मर्यादित राहिलेली नाही. मागील काही वर्षांपासून वारीचा हा ट्रेंड बदलत असून, शहरातील तथाकथित ‘हाय प्रोफाईल’ वारकरीही वारीमध्ये उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत आहेत. यामध्ये तरुणाईही मागे नाही. शहरांमध्ये महाविद्यालयात शिक्षण घेणारी तरुण मंडळीही वारीचे ‘प्लॅनिंग’ करताना दिसून येते. प्रत्येकाला आकर्षित करून घेणारे असे काय या दिंडी सोहळ्यात दडलेले आहे, हे अजूनही न उलगडलेले आणि दिवसेंदिवस अधिकच गहिरे होत जाणारे ही कोडे आहे.
वारकरी परंपरा किंवा कीर्तन, प्रवचन, भारूड याकडे संतांनी कायम सामाजिक प्रबोधनाचे माध्यम म्हणून पाहिले आहे. हाच वारसा अजूनही या वारीतून झिरपताना दिसतो. आता तर अत्यंत नवनव्या पद्धती वापरून वारकऱ्यांचे प्रबोधन केले जाते. आरोग्य, बेटी बचाओ, पाण्याचा वापर, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, शिक्षणाचे महत्त्व, व्यसनापासून मुक्ती, या आणि अशा अनेक सामाजिक विषयांवर वारीत भर दिला जातो आणि प्रबोधन केले जाते. वारीत दिसून येणारा सेवाभावही निश्चितच उल्लेखनीय ठरतो.