बिबट्यामुळे खलंग्री गावात दहशत; पकडण्यासाठी पिंजरा लावला
By Admin | Published: May 18, 2017 12:09 AM2017-05-18T00:09:55+5:302017-05-18T00:18:58+5:30
रेणापूर : तालुक्यातील खलंग्री शिवारात देवीदास शिवाजी चिकटे या तरुणावर मंगळवारी हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
रेणापूर : तालुक्यातील खलंग्री शिवारात देवीदास शिवाजी चिकटे या तरुणावर मंगळवारी हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्यावतीने बुधवारी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. दरम्यान, पानगाव परिसरातील इनामवाडी शिवारात बिबट्या दिसल्याने या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
रेणापूर तालुक्यातील खलंग्री परिसरात बिबट्या दिसल्याने त्याला पकडण्यासाठी बुधवारी वनविभागाने दोन पिंजरे लावले आहेत. वनविभागचे १३ कर्मचारी व स्थानिक पोलीस बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बुधवारी दुपारच्या सुमारास हा बिबट्या पानगाव परिसरातील इनामवाडी शिवारात दिसल्याने एकच खळबळ उडाली. परिणामी, परिसरातील गावकऱ्यांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्याची पाहणी तहसीलदार मंजुषा लटपटे यांनी करुन जनतेशी संवाद साधला. घाबरू नका, प्रशासन बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्या म्हणाल्या़