पंकजांना धक्का; कृउबा राकाँकडे
By Admin | Published: May 15, 2017 11:41 PM2017-05-15T23:41:23+5:302017-05-15T23:43:22+5:30
परळी : येथील प्रतिष्ठेच्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सोमवारी राष्ट्रवादी- काँग्रेसच्या पॅनलने भाजप पॅनलचा अक्षरश: धुव्वा उडवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : येथील प्रतिष्ठेच्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सोमवारी राष्ट्रवादी- काँग्रेसच्या पॅनलने भाजप पॅनलचा अक्षरश: धुव्वा उडवला. राकॉ- काँग्रेसने १८ पैकी १४ जागांवर दणदणीत यश मिळविले. भाजपच्या पदरात अवघ्या चार जागा पडल्या. या विजयाने धनंजय मुंडे यांनी कृउबातील वर्चस्व अबाधित राखले असून पंकजा यांना मात्र, पालिका, जि.प.- पं. स. पाठोपाठ कृउबामध्येही दारुण पराभवाचा सामना करावा लागला.
धनंजय मुंडे यांनी काँग्रेसचे प्रा. टी.पी. मुंडे, संजय दौंड यांना सोबत घेऊन आघाडी स्थापन केली होती. तर भाजपने स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणे पसंद केले होते. संचालकपदाच्या १८ जागांसाठी मुंडे बंधू- भगिणीच्या पॅनलमध्ये थेट सामना झाला. सहा अपक्षांनीही नशीब आजमावले. राकॉ- काँग्रेस आघाडी प्रणित स्व.पंडितअण्णा मुंडे शेतकरी विकास पॅनलचे १४ उमेदवार विजयी झाले, तर भाजपच्या स्व. गोपीनाथराव मुंंडे शेतकरी विकास पॅनलने अवघ्या चार जागा पटकावल्या. रविवारी ८ केंद्रांवर १९१३ पैकी १८४७ मतदारांनी हक्क बजावला होता. सोमवारी सकाळी जि.प. कन्या प्रशालेच्या इमारतीत मतमोजणीला प्रारंभ झाला. तीन तासात मतमोजणी प्रक्रिया संपली. सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या राकॉ- काँग्रेसच्या पॅनलने शेवटपर्यंत सरशी कायम राखत १४ जागांवर विजय मिळविला. सर्व उमेदवार चांगल्या फरकाने विजयी झाले.
स्व. अण्णांना विजय समर्पित - धनंजय मुंडे
विजयानंतर जगमित्र संपर्ककार्यालयातील स्व.पंडितअण्णा मुंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन धनंजय मुंडे यांनी अभिवादन केले. जिवाला जीव देणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच हा विजय शक्य झाल्याचे ते म्हणाले. स्व. पंडितअण्णांनी चेअरमन म्हणून केलेल्या कार्याची मतदारांनी पावती दिली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. भाजपने या निवडणुकीत प्रचंड धनशक्तीचा, सत्तेचा वापर करूनही मतदारांनी आपल्याला कौल दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी, हमाल- मापाड्यांना न्याय देण्याचे काम आपण यापुढेही करु असे ते म्हणाले. हा विजय स्व. पंडित आण्णांना समर्पित करत असल्याचे भावोद्गार त्यांनी काढले.