धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अखेर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 11:24 AM2021-01-25T11:24:26+5:302021-01-25T11:54:10+5:30
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर पहिल्यांदाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर पहिल्यांदाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "तो विषय आता मागे पडला आहे. तरीही त्यावर परत परत बोलावं लागू नये म्हणून तुम्ही आता आलाच आहात तर सैद्धांतिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं मी कधीही समर्थन करू शकत नाही", असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्या औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
"कुठल्याही एका गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला किंवा त्या कुटुंबातील ज्यांचा काही दोष नाही अशा लहान मुलांना त्रास होतो. मी महिला बालकल्याण मंत्रीही राहिलेली आहे. सहाजिक एक नातं म्हणून आणि महिला म्हणून मी याकडे संवेदनशीलपणे बघते. हा विषय कोणाचाही असता तरी मी त्याचं राजकीय भांडवल केलं नसतं आणि आताही करणार नाही. यात संवेदनशीलपणे विचार करायला हवा. ज्या काही गोष्टी आहेत, त्याचा भविष्यात निकाल लागेलच", असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
ओबीसीचा मुख्यमंत्री?... पंकजा म्हणाल्या 'मला थोडं बाजूला ठेवा'!
जालना येथे रविवारी ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा पार पडला होता. यात पुढचा मुख्यमंत्री ओबीसी समाजाचाच होणार असा बॅनर दिसला होता. याबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सावध पवित्रा घेतला. "मला याच्यापासून थोडं मुक्त ठेवा. आता ही चळवळ मला कुठल्याही पदावर नसताना लढायची आहे आणि ते माझ्यासाठी जीवनातील एक महत्वाचं ध्येय आहे. मुंडे साहेबांची ती एक अधुरी लढाई आहे ती पूर्ण करायची आहे", असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे
"ओबीसींची जनगणना झाली पाहिजे ही भूमिका गोपीनाथ मुंडे साहेबांनीही वेळोवेळी मांडली आहे. संसदेत मांडली आहे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनाही याबाबत आवाज उठवला आहे. आता जनगणना होणार आहे. त्यामुळे जातीनिहाय जनगणना व्हायलायच हवी यातून प्रत्येक गोष्टी रडारवर येतील आणि स्पष्ट होतील. आपल्याला त्या समूदायाला न्याय देताना मदत होईल", असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
Live: मुंबईतील किसान सभेच्या शेतकरी आंदोलनाचे सर्व अपडेट्स
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार
शेतकरी आंदोलनाबाबत पंकजा मुंडे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचंच सरकार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतले आहेत आणि आताही सरकार शेतकऱ्यांशी चर्चेची तयारी दाखवत आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.