बालहक्क आयोग अध्यक्ष नियुक्तीबाबत पंकजा मुंडेंचे मौन
By Admin | Published: June 1, 2017 09:24 PM2017-06-01T21:24:05+5:302017-06-01T21:24:05+5:30
राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे प्रवीण घुगे यांनी बुधवारी स्वीकारल्यानंतर त्यांची नियुक्ती वादाच्या भोव-यात सापडली आहे.
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 01 - राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे प्रवीण घुगे यांनी बुधवारी स्वीकारल्यानंतर त्यांची नियुक्ती वादाच्या भोव-यात सापडली आहे. त्यांच्या नियुक्तीबाबत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरूवारी बोलणे टाळले.
ब-याच काळानंतर पंकजा मुंडे यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी गुरूवारी औपचारिक गप्पा मारल्या. अलीकडे त्या पत्रकारांना टाळत आहेत. परंतु त्यांना गुरूवारी पत्रकारांशी बोलण्याची इच्छा झाली. घुगे हे पत्रकार परिषद झाल्यानंतर तेथे आले. मुंडे यांनी पत्रपरिषदस्थळ सोडताच ते तेथून निघून गेले.
एरव्ही ग्रामविकास मंत्री शहरात आल्यानंतर त्यांच्या मागे-पुढे असणारे घुगे यांनी यावेळी पत्रकार परिषदेलाच दांडी मारली. घुगे यांची महिला व बालकल्याण खात्याने या आयोगाचे अध्यक्षपदी केलेल्या नियुक्तीचे वृत्त लोकमतने गुरूवारच्या अंकात प्रकाशित केल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यामुळे याप्रकरणात ग्रामविकास मंत्री मुंडे काय लक्ष घालतात हे जाणून घेण्यासाठी त्यांना घुगे नियुक्तीबाबत विचारणा केली. परंतु त्यांनी त्या प्रश्नाला बगल दिली. त्यांनी विभागाच्या विकासकामांचा पाढा पत्रपरिषदेत वाचला. त्यानंतर त्यांना फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्या बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत होत्या.
महिला व बालकल्याण खात्याने या आयोगाचे अध्यक्ष व सदस्य नेमण्यासाठी इच्छुकांकडून नामांकने मागविणारी जाहिरात दिली होती. त्यात अध्यक्ष वा सदस्याविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा असू नये, तसेच कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असू नये, अशीही अट त्यात होती. मात्र दोन्ही अटी गुंडाळून ठेवून घुगे यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे ही नियुक्ती गुणवत्तेवर नव्हेतर, राजकीय बक्षिसी म्हणून झाल्याचे दिसते.
अशी ही टाळाटाळ...
ग्रामविकास मंत्र्यांना संपर्क केला असता त्यांचे मोबाईल स्वीय सहायकांकडे होते. तिघांशी संपर्क केला, परंतु एकानेही त्यांचे बोलणे करून दिले नाही. शेवटी कोणत्या विषयावर प्रतिक्रिया हवी आहे, असा प्रश्न त्यांच्या एका स्वीय सहायकानेच विचारला. घुगे यांच्या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया हवी असल्याचे विचारल्यावर हो म्हणून त्या स्वीय सहायकाने फोन ठेऊन दिला. दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्यांना अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली नाही.