पंचनामे झालेल्या तुरीचेच माप !
By Admin | Published: May 11, 2017 11:42 PM2017-05-11T23:42:07+5:302017-05-11T23:43:21+5:30
लातूर : नाफेड अंतर्गत लातूर जिल्ह्यात आठ खरेदी केंद्रांवर २ लाख ४९ हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली असून २२ एप्रिलपूर्वी नोंदी (पंचनामा) झालेल्या ७० हजार क्विंटल तुरीची खरेदी सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : नाफेड अंतर्गत लातूर जिल्ह्यात आठ खरेदी केंद्रांवर २ लाख ४९ हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली असून २२ एप्रिलपूर्वी नोंदी (पंचनामा) झालेल्या ७० हजार क्विंटल तुरीची खरेदी सुरू आहे. यातील १९ दिवसांत १६ हजार ८०० क्विंटल तुरीची खरेदी झाली असून ५३ हजार २०० क्विंटल तुरीचे माप सध्या सुरूच आहे. दरम्यान, शासनाकडून तूर खरेदी केंद्रांना मुदतवाढ दिली असल्याचे सांगितले जात असले, तरी अद्याप जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयास हे आदेश प्राप्त झाले नाहीत.
लातूर जिल्ह्यात लातूर, उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर, मुरुड, रेणापूर, औसा, शिरूर अनंतपाळ येथे नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. ५ हजार ५०० रुपये क्विंटल दराने या केंद्रावर तूर खरेदी करण्यात येत होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी या केंद्रावर तूर विक्रीसाठी गर्दी केली होती. २२ मे पर्यंत १६ हजार शेतकऱ्यांची २ लाख ४९ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. २२ मे रोजी पंचनामे झाल्यानंतर १ हजार ६० शेतकऱ्यांची १६ हजार ८०० क्विंटल तूर खरेदी केली. उर्वरित तुरीचे माप सुरु आहे. तूर खरेदी केंद्र बंद केल्याने २२ एप्रिलनंतर तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची तूर घेण्यात आली नाही. केंद्रावर पंचनामे झालेल्याच तुरीचे माप घेण्यात येत आहे.
९४ कोटींचे पेमेंट करण्यात आले असून, २९ कोटींचे पेमेंट शासनाकडे थकले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांकडून तूर खरेदी केंद्र चालू ठेवण्याची मागणी होत असली, तरी अद्याप शासनाकडून तसे आदेश आले नसल्यामुळे पंचनाम्याव्यतिरिक्त तुरीची खरेदी बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.