'पपा मला वाचवा'; रिक्षाचालकाकडून मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, रस्त्यात वडील दिसल्याने सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 05:48 PM2023-04-12T17:48:39+5:302023-04-12T17:52:09+5:30
मुलीच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला; जीवावर बेतलेल्या प्रसंगातून झाली सुटका
- शेख मेहमूद
वाळूज महानगर : रिक्षातून घरी परतणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा रिक्षाचालकाद्वारे अपहरण करण्याचा प्रयत्न बुधवारी मुलीच्या प्रसंगावधानानेच फसला. विद्यार्थिनीने आरडाओरडा केल्याने नागरिक मदतीसाठी धावून आले, पुढील अनर्थ टळला. नंतर संतप्त जमावाने रिक्षाचालकास चोप दिल्यानंतर तो पसार झाला.
तृप्ती (१७, नाव बदलले आहे) ही कुटुंबासह रांजणगावात वास्तव्यास असून बजाजनगरातील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेते. दररोज तृप्ती रिक्षातून क्लासला ये-जा करते. बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास क्लास संपल्यानंतर तृप्ती घरी जाण्यासाठी उद्योगनगरीतील स्टरलाइट कंपनीसमोरून रिक्षाची वाट पाहत उभी होती. यावेळी पंढरपूरकडून रांजणगावकडे जाणाऱ्या रिक्षा (क्रमांक एम.एच.२०, ई.एफ.५५४१)च्या चालकाने रिक्षा थांबविली. या रिक्षात एकही प्रवासी नव्हता. तृप्तीने मला रांजणगावात जायचे असल्याचे सांगितल्यानंतर रिक्षाचालकाने तिला रिक्षात बसवले. रांजणगावच्या दिशेने निघाला होता.
दरम्यान, रांजणगाव फाट्यावर आल्यानंतर रिक्षाचालकाने गावात रिक्षा वळविण्याऐवजी सुसाट वेगाने रिक्षा घेऊन सीएट रोडने निघाला. रस्त्यात तृप्तीने रिक्षाचालकास सतत विनवण्या केल्या. मात्र तिच्या बोलण्याकडे रिक्षाचालकाने दुर्लक्ष केले. रिक्षा अधिक वेगाने पुढे नेऊ लागला. रिक्षाच्या दरवाजाजवळ दोन्ही बाजूने पुठ्याचे कव्हर लावलेले असल्याने तसेच रिक्षा वेगात असल्याने तृप्तीला रिक्षातून उडी मारता आली नाही.
आरडाओरडा केल्याने अनर्थ टळला
वडिलांच्या वयाचा असलेला रिक्षाचालक सुसाट वेगाने रिक्षा पळवित होता. अपहरण व छेडछाडीच्या भीतीमुळे घाबरलेल्या तृप्तीने रिक्षाचालकास रिक्षा थांबविण्यासाठी गयावया सुरू केली. अशातच ही रिक्षा ऋचा इंजिनिअरिंग कंपनीजवळ सुसाट वेगाने जात असताना तृप्ती हीस तिचे वडील दिसले. तिने जिवाच्या आकांताने पप्पा.. पप्पा हाक मारून ओरडल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारक व तृप्तीच्या वडिलांनी रिक्षाचा पाठलाग केला. काही अंतर पाठलाग केल्यानंतर तृप्तीच्या वडिलांनी रिक्षासमोर दुचाकी आडवी लावली. रिक्षा थांबली. यानंतर संतप्त जमावाने रिक्षाचालकास बेदम चोप दिला. घटनेनंतर तृप्तीस वडिलांनी धीर दिला. चौकशी केली असता तिने आपबिती सांगितली.
रिक्षा चालक पोलीस ठाण्यात आला
या घटनेनंतर रिक्षाचालक संधी साधून घटनास्थळी रिक्षा सोडून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच ११२ हेल्पलाइनच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तृप्ती हिची विचारपूस केली. मारहाणीत जखमी झालेला रिक्षाचालक जमावाच्या तावडीतून निसटत पोलिस ठाण्यात हजर झाला. या रिक्षाचालकाच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव सुरू असल्याने पोलिसांनी त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आहे.