पापडाची लगबग सुरू, नवीन डाळी बाजारात; भाव मात्र शंभरीपार !
By प्रशांत तेलवाडकर | Published: March 14, 2024 11:37 AM2024-03-14T11:37:47+5:302024-03-14T11:37:59+5:30
देशात डाळींच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, आयातीत डाळी बाजारात विक्रीला आल्याने भाववाढ थांबली आहे.
छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्याला सुरुवात झाली आणि घरोघरी महिलांची पापड करण्याची लगबग सुरू झाली आहे. याच काळात नवीन मूगडाळ, उडीदडाळ, तूरडाळ व मठडाळ बाजारात आल्या आहेत. मात्र, भाव कमी होण्याऐवजी वाढले आहेत. यंदा अवकाळी पावसाचा मोठा फटका डाळीच्या उत्पादनावर झाला आहे. हरभरा डाळ व मसूर डाळ वगळता सर्व डाळी सध्या शंभरीपार करून गेल्या आहेत.
कोणत्या डाळींचा भाव काय ? (प्रति किलो)
प्रकार सध्याचा भाव आधीचा भाव
तूर डाळ १५०रु. --१६०रु.
हरभरा डाळ ७६रु.--७२ रु.
मसूर डाळ ९०रु. -- ९०रु.
मूग डाळ ११४रु.--- १०८रु.
उडीद डाळ १२६रु.-- १२६रु.
मठ डाळ १२०रु.-- १२०रु.
आयातीत डाळीचा प्रभाव
देशात डाळींच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, आयातीत डाळी बाजारात विक्रीला आल्याने भाववाढ थांबली आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा व रशिया येथून डाळीची आवक होत आहे. यात मसूर डाळीचा समावेश आहे. हरभरा डाळीनंतर आता आयातीत मसूर डाळही भविष्यात स्वस्त धान्य दुकानावर विक्रीला येऊ शकते.
हरभरा व मसूर डाळीची प्रतीक्षा
नवीन हरभरा डाळ व मसूर डाळ येत्या आठ दिवसांनी बाजारात दाखल होतील. या डाळींची सध्या प्रतीक्षा आहे.
डाळींची भाववाढ होणार नाही ?
डाळींचे भाव स्वस्त होण्याची शक्यता कमीच आहे. कारण, तूर, उडीद, मूग, मठ यांचे उत्पादन कमी झाले आहे. पुढे लोकसभा निवडणुका असल्याने केंद्र सरकार डाळींचे भाव वाढू देणार नाही. आयातीत डाळी आणणे सुरू राहिल्यास भाव स्थिर राहतील.
- श्रीकांत खटोड, व्यापारी