अभियांत्रिकीचा पेपर फुटल्याची अफवा
By Admin | Published: May 24, 2016 12:55 AM2016-05-24T00:55:04+5:302016-05-24T01:22:20+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या अभियांत्रिकी द्वितीय वर्षाचा गणिताचा पेपर फुटल्याची अफवा सोमवारी दिवसभर फिरत होती.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या अभियांत्रिकी द्वितीय वर्षाचा गणिताचा पेपर फुटल्याची अफवा सोमवारी दिवसभर फिरत होती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ही बाब विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली असता हे ऐकून सुरुवातीला प्रशासन हादरले. त्यांनी शहरातील सर्व परीक्षा केंद्रांकडे यासंबंधीची तात्काळ चौकशी केली, तेव्हा मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याची माहिती समोर आली.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षेला १३ मेपासून सुरुवात झाली. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये अभियांत्रिकीचे १९ परीक्षा केंद्रे असून, यापैकी १२ परीक्षा केंद्रे औरंगाबाद शहरात आहेत. या परीक्षेला सकाळी १० वाजता प्रारंभ होतो. तत्पूर्वी, सर्व परीक्षा केंद्रांवर विद्यापीठाकडून त्या- त्या दिवशीच सकाळी ८.३० वाजता आॅनलाईन पेपर पाठविले जातात.
दरम्यान, आज सकाळी ८.३० ते ९.३० वाजेदरम्यान काही विद्यार्थ्यांच्या व्हॉटस्अॅपवर अभियांत्रिकी द्वितीय वर्षाच्या गणित (क्रमांक-४) पेपरचे काही प्रश्न फिरत असल्याची कुणकुण लागली. मात्र, दिवसभरात एकाही विद्यार्थ्याने अथवा संबंधित परीक्षा संचालकांनी किंवा प्राचार्यांनी यासंबंधीची तक्रार विद्यापीठ परीक्षा विभागाकडे केलेली नव्हती.
परीक्षा नियंत्रक डॉ. नेटके यांनी खोलात जाऊन यासंबंधीची चौकशी केली तेव्हा आजचा पेपर फुटला नसल्याची माहिती समजताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. काही अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर एक-दोन गेस प्रश्न व्हायरल झाले होते. तोच धागा पकडून काही जणांनी खोडसाळपणे अभियांत्रिकी द्वितीय वर्षाचा गणिताचा पेपर फुटल्याची अफवा पसरवली. ही अफवा वाऱ्यासरशी विद्यापीठात पोहोचली आणि विद्यापीठ प्रशासन हादरून गेले. अफवा पसरविणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध विद्यापीठ प्रशासन घेत आहे.
दुपारी पेपर फुटल्याची माहिती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून समजली तेव्हा सर्व केंद्रप्रमुख तसेच प्राचार्यांकडून माहिती जाणून घेतली. तेव्हा असा प्रकार कुठेही घडलेला नसल्याचे समजले. यासंबंधीची तक्रार एकाही परीक्षार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, केंद्रप्रमुखांनी लेखी, तोंडी दिलेली नाही. ही केवळ अफवा आहे, असे परीक्षा नियंत्रक डॉ. दिगंबर नेटके यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनीही परीक्षेदरम्यान सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत.