विद्यापीठाच्या 'त्या' परीक्षा केंद्रावरील पेपर पुन्हा होणार: उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 03:23 PM2022-06-02T15:23:20+5:302022-06-02T15:43:29+5:30
महाविद्यालयातील परीक्षा केंद्र रद्द करण्यात आल्याची माहिती प्र-कुलगुरू शाम शिरसाट यांनी केली.
औरंगाबाद: शहरातील एका परीक्षा केंद्रात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी आल्याने पदवीच्या पहिल्याच पेपरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नियोजनाचा सावळागोंधळ दिसून आला. यामुळे एका बेंचवर तीन तीन विद्यार्थी परीक्षा देत होते. या गोंधळाची गंभीर दखल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली असून २४ तासांत दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी घोषणा केली.
कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत. कालपासून परीक्षा सुरु झाल्या आहेत. बुधवारी पहिल्या दिवशी बॅकलाॅगचा पेपर असल्याने विद्यार्थी संख्या कमी होत. मात्र, आज नियमित पेपरच्या नियोजनातील विद्यापीठाचा गोंधळ पुढे आला. शहरातील एका महाविद्यालयात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र देण्यात आले. यामुळे आज सकाळी ९ वाजता पहिल्या पेपरला जवळपास ११०० विद्यार्थी महाविद्यालयात धडकले. अतिरिक्त विद्यार्थी आल्याने केंद्रावर एकच गोंधळ उडाला. तीन तीन परीक्षार्थ्याना एकाच बेंचवर बसविण्यात आले. तसेच उपलब्ध जागेत खुर्च्या टाकून परीक्षार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली. तरीही २०० विद्याथी अतिरिक्त ठरले. अशा गोंधळाच्या वातावरणात दाटीवाटीने परीक्षा घेण्यात आली. या गोंधळाची गंभीर दाखल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.
या केंद्रावरील पेपर पुन्हा होणार
या केंद्रावर बीएस्सी संगणक शास्त्र, बायोटेक आणि आयटी या विषयांचे पेपर होते. झालेल्या गोंधळामुळे या केंद्रावरील पेपर पुन्हा घेण्यात येणार असल्याची घोषणा देखील मंत्री सामंत यांनी केली.
केंद्रावर प्र-कुलगुरू, परीक्षा नियंत्रकांची भेट
अपुऱ्या बैठक व्यवस्थेमुळे गोंधळ उडाल्याची माहिती मिळताच प्रभारी परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक गणेश मंझा, प्र- कुलगुरू शाम सिरसाट यांनी केंद्रावर भेट दिली. महाविद्यालयाची क्षमता ६०० असताना ११०० विद्यार्थी कसे आले याची माहिती घेण्यात येत असल्याचे मंझा यांनी सांगितले. तर या महाविद्यालयातील परीक्षा केंद्र रद्द करण्यात येत असल्याची माहिती प्र-कुलगुरू सिरसाट यांनी दिली.