पैशासाठी "समांतर" कंपनीच्या मनपाला पुन्हा धमक्या; लवादासमोर जाण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 11:36 AM2021-02-13T11:36:33+5:302021-02-13T11:38:16+5:30

जायकवाडीहून शहरात पाणी आणण्यासाठी महापालिकेने सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड (एसपीएमएल) या कंपनीची निविदा मंजूर केली होती.

"Parallel Water Company" threatens again for money; A warning to go to arbitration | पैशासाठी "समांतर" कंपनीच्या मनपाला पुन्हा धमक्या; लवादासमोर जाण्याचा इशारा

पैशासाठी "समांतर" कंपनीच्या मनपाला पुन्हा धमक्या; लवादासमोर जाण्याचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिका व कंपनी यांच्यात वाद निर्माण झाल्यास तो सोडविण्यासाठी लवाद स्थापन करण्याची करारात तरतूद होती. कंपनीने यापूर्वीच महापालिकेकडे १३७ कोटींची मागणी केली होती. परंतु, शासनाच्या मध्यस्तीने २९ कोटी रुपयांवर तडजोड करण्यात आली.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीसाठी कंपनीसोबत केलेला करार संपुष्टात आणण्यासाठी आणखी रक्कम द्यावी, अन्यथा लवादापुढे जाणार असल्याचा इशारा एसपीएमएल कंपनीने महापालिकेला दिला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या मनपासमोर आता नवीन आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. या गंभीर संकटातून मार्ग काढावा याकरिता हे प्रकरण शासनाकडे सोपविण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.

जायकवाडीहून शहरात पाणी आणण्यासाठी महापालिकेने सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड (एसपीएमएल) या कंपनीची निविदा मंजूर केली होती. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत दोन हजार मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम एसपीएमएल कंपनीने प्राधान्याने करायचे होते, पण या कामाऐवजी अन्य कामे कंपनीकडून केली जात होती. पीपीपी तत्त्वावरील पाणीपुरवठा योजनेसाठी जलउपविधी (वॉटर बायलॉज) राज्य शासनाकडून मंजूर करुन घेण्यात आले, त्यानुसार पाणीपट्टीत दरवर्षी १० टक्के वाढ केली जात होती. यामुळे नागरिकांचा समांतर जलवाहिनी योजनेला विरोध वाढला. त्याचा परिणाम म्हणून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने एसपीएमएल बरोबरचा पाणीपुरवठा योजनेचा करार रद्द केला.

महापालिका व कंपनी यांच्यात वाद निर्माण झाल्यास तो सोडविण्यासाठी लवाद स्थापन करण्याची करारात तरतूद होती. त्यानुसार लवादाची स्थापना करण्यात आली. लवादासमोर सुमारे अडीच-तीन वर्षे प्रकरण सुरू होते. त्याचबरोबर सर्वाेच्च न्यायालयातदेखील कंपनीच्या बँक गॅरंटीच्या संदर्भात प्रकरण सुरू होते. हे प्रकरण आपसात तडजोड करुन संपविण्यात आले. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने महापालिकेला आदेश देत कंपनीला २९ कोटी रुपये देण्यास सांगितले. २९ कोटी रुपये मनपाने दिल्यावर लवादासमोरील प्रकरण मागे घेण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे लवाद संपुष्टात आल्याचे महापालिकेकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले.

महापालिकेला पुन्हा दिला इशारा
कंपनीने यापूर्वीच महापालिकेकडे १३७ कोटींची मागणी केली होती. परंतु, शासनाच्या मध्यस्तीने २९ कोटी रुपयांवर तडजोड करण्यात आली. आता कंपनीने महापालिकेकडे उर्वरित रकमेची मागणी केली आहे. ही रक्कम न दिल्यास पुन्हा लवादासमोर जाऊ, असा इशारादेखील दिल्याची माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.

Web Title: "Parallel Water Company" threatens again for money; A warning to go to arbitration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.