पारस मंडलेचा यांच्याकडे संपूर्ण अधिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:02 AM2021-09-07T04:02:56+5:302021-09-07T04:02:56+5:30
औरंगाबाद : मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले डॉ. पारस मंडलेचा यांच्याकडे आता आरोग्य विभागाची संपूर्ण जबाबदारी ...
औरंगाबाद : मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले डॉ. पारस मंडलेचा यांच्याकडे आता आरोग्य विभागाची संपूर्ण जबाबदारी साेपविली. त्यामुळे डॉ. नीता पाडळकर यांना आता वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहावे लागणार आहे.
शासनाने पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदी दोन महिन्यांपूर्वी डॉ. मंडलेचा यांची प्रतिनियुक्तीवर बदली केली. प्रशासक यांनी डॉ. मंडलेचा यांना पालिकेच्या सेवेत रुजू करून घेतले. पण, त्यांना आरोग्य विभागाची पूर्ण जबाबदारी दिली नव्हती. वैद्यकीय आरोग्य अधिकारी- १ असे डॉ. मंडलेचा यांना संबोधण्यात आले, तर डॉ. नीता पाडळकर यांना वैद्यकीय आरोग्य अधिकारी- २ असे संबोधले जाऊ लागले. डॉ. पाडळकर यांच्याकडे कोरोना प्रतिबंधाची जबाबदारी देण्यात आली, तर डॉ. मंडलेचा यांच्याकडे आरोग्य विभागाच्या प्रशासनाची जबाबदारी देण्यात आली. प्रशासक यांनी कार्यालयीन आदेश काढून वैद्यकीय आरोग्य अधिकारी या पदाचा पूर्ण कार्यभार डॉ. मंडलेचा यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे नमूद केले. त्यामुळे डॉ. पाडळकर वैद्यकीय आरोग्य अधिकारी न राहता आता केवळ वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहतील, हे स्पष्ट झाले. त्यांची एखाद्या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते.