‘सर्वांसाठी घरे’ प्रकल्पासाठी परभणी शहराची निवड
By Admin | Published: February 17, 2016 11:06 PM2016-02-17T23:06:51+5:302016-02-17T23:13:41+5:30
राजन मंगरूळकर, परभणी प्रत्येक कुटुंबास सर्व सुविधांसह पक्के घर उपलब्ध व्हावे, या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना अभियान अंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ हा प्रकल्प केंद्र शासनाने हाती घेतला आहे़
राजन मंगरूळकर, परभणी
प्रत्येक कुटुंबास सर्व सुविधांसह पक्के घर उपलब्ध व्हावे, या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना अभियान अंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ हा प्रकल्प केंद्र शासनाने हाती घेतला आहे़ या प्रकल्पासाठी परभणी महानगरपालिका क्षेत्राची निवड करण्यात आली आहे़ त्यामुळे या योजनेंतर्गत शहरातील नागरिकांना मनपा क्षेत्रात योजनेचा लाभ घेता येणार आहे़
प्रधानमंत्री आवास योजना २५ जून २०१५ रोजी सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती़ या अभियाना अंतर्गत सन २०१५ ते २०२२ या कालावधीत ही योजना देशभरात राबविली जाणार आहे़ पहिल्या टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या योजनेत महाराष्ट्रातून परभणी शहराची निवड झाली आहे़ याबाबत शासनाकडून मनपाला योजनेची माहिती देण्यात आली होती़ त्यानुसार १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा विषय सभागृहासमोर मांडण्यात आला़ या योजनेविषयीची माहिती सभागृहाला देण्यात आल्यानंतर सभागृहाने एकमताने ही योजना शहरात राबविण्याबाबत मंजुरी दिली़ त्यानुसार महानगरपालिकेकडून शासनाला योजनेच्या मान्यतेबाबतचा प्रस्ताव पुढील काही दिवसांमध्ये पाठविण्यात येणार आहे़ प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक व शहरातील अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे़
या शिवाय इतर पात्र लाभार्थ्यांना देखील सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे़ सदर योजनेत केंद्र शासनाकडून लाभार्थ्यास घर बांधणीसाठी ६ लाख रुपये सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये लाभार्थ्यांच्या कुटुंबामध्ये पती, पत्नी व अविवाहित मुले यापैकी त्यांच्या नावावर व त्यांच्या सदस्याच्या नावावर भारतात कुठेही पक्के घर नसले पाहिजे़
योजनेत चटई क्षेत्र ३० वर्ग मीटर तर ३२५ चौरस फूट क्षेत्रफळ घर बांधण्यासाठी असणे गरजेचे आहे़ ज्या लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न ३ लाखापर्यंत आहे़ अशा अत्यल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना योजनेचा लाभ घेता येणार आहे़ परभणी शहरातील ७१ गलिच्छ वस्तीचा विकास करण्यासाठी या वस्तीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना राबविण्याबाबत महापालिकेकडून शासनाला सभागृहाच्या मान्यतेचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे़ यानंतर या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी शासनस्तरावरून सुरू होणार आहे़