परभणी-गंगाखेड रस्त्याचा निर्णय खड्ड्यातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:43 PM2017-10-31T23:43:41+5:302017-10-31T23:43:52+5:30
जिल्ह्यात सर्वाधिक वर्दळ असलेल्या व दुरवस्थेचा कळस गाठलेल्या परभणी-गंगाखेड या रस्त्याच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पहिल्या टप्प्यातून वगळल्याने याबाबतचा निर्णय खड्ड्यात गेला असून, या रस्त्यावरील खड्डे भरण्याला कंत्राटदारांनीही नकार दिल्याने या रस्त्यावरून प्रवास करणाºयांच्या मागे लागलेली साडेसाती पाठ सोडायला तयार नाही़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात सर्वाधिक वर्दळ असलेल्या व दुरवस्थेचा कळस गाठलेल्या परभणी-गंगाखेड या रस्त्याच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पहिल्या टप्प्यातून वगळल्याने याबाबतचा निर्णय खड्ड्यात गेला असून, या रस्त्यावरील खड्डे भरण्याला कंत्राटदारांनीही नकार दिल्याने या रस्त्यावरून प्रवास करणाºयांच्या मागे लागलेली साडेसाती पाठ सोडायला तयार नाही़
परभणी जिल्ह्यात ढालेगाव बंधारा ते मानवतपर्यंत राष्ट्रीय महामार्ग २२२ चा एकमेव रस्ता सोडला तर कोठेही चांगल्या दर्जाचे रस्ते नाहीत़ बहुतांश रस्ते हे खड्डेमय झाले असून, परभणी शहरामध्ये येणाºया प्रत्येक रस्त्याचा प्रवास खड्ड्यातूनच होत असल्याने परभणीवासिय वैतागले आहेत़ विशेषत: परभणी ते गंगाखेड या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे एक प्रकारे शिक्षाच वाटू लागली आहे़ या ४० किमीच्या रस्त्यावर १०० मीटरचाही रस्ता असा नाही जेथे खड्डे नाहीत़ त्यामुळे गंगाखेड-परभणी व परभणी- गंगाखेड ये-जा करणाºया प्रवाशांची हाडे खिळखिळी झाली आहेत़ त्यामुळे या रस्त्यावरून वाहनाने प्रवास करण्याऐवजी रेल्वेने प्रवास करणे अनेकांनी पसंत केले आहे़ काही दिवसांपूर्वी उपहासातून शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या रस्त्याला ‘नरेंद्र मोदी बुलेट एक्सप्रेस हायवे’ असे नामकरण केले होते़ तरीही प्रशासकीय पातळीवरील सुत्रे हालली नसल्याची बाब समोर आली आहे़
केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी २९ जुलै रोजी जालना जिल्ह्यातील वाटूर फाटा येथे परभणी लोकसभा मतदार संघातील ५ हजार कोटी रुपयांच्या रस्ता कामाचे उद्घाटन केले होते़ त्यामध्ये परभणी ते गंगाखेड या रस्त्याचा समावेश होता़ विशेष म्हणजे राज्य मार्ग असलेला हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात घेण्यात आल्याने गेल्या १५ वर्षांपासून दुरवस्था झालेल्या या रस्त्याचे भाग्य उजळेल, अशी अपेक्षा होती़ परंतु, ही अपेक्षा आता फोल ठरली आहे़ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पहिल्या टप्प्यात जिंतूर ते परभणीपर्यंतच्या रस्त्याचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे़ पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसºया टप्प्यात परभणी ते गंगाखेड या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे़ तशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या नांदेड येथील सूत्रांकडून मिळाली़ आता पहिला टप्पाच सुरू झालेला नाही़, तेव्हा दुसºया टप्प्याचा विचारच न केलेला बरा़ त्यामुळे परभणी-गंगाखेड या रस्त्याचे तातडीने नव्याने काम होण्याची शक्यता तूर्तास तरी मावळली आहे़ परिणामी या रस्त्यावरून ये-जा करणाºया वाहनधारकांच्या मागे लागलेली खड्ड्यांची साडेसाती पाठ सोडण्याचे नाव घेत नाही़ त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाºयांना ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा करावी लागणार आहे़