परभणीची ज्योती गवते, सैन्यदलाच्या दूधनाथ ठरले विजेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:49 AM2017-11-27T00:49:50+5:302017-11-27T00:50:37+5:30
दोन वर्षांपासून जबरदस्त सूर गवसलेल्या आणि अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये चॅम्पियन ठरलेल्या परभणीच्या ज्योती गवतेने पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करताना एमआयटी औरंगाबाद हेरिटेज हाफ मॅरेथॉनमध्ये महिला गटातील २५ कि. मी. अंतरात विजेतेपद पटकावले.
औरंगाबाद : दोन वर्षांपासून जबरदस्त सूर गवसलेल्या आणि अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये चॅम्पियन ठरलेल्या परभणीच्या ज्योती गवतेने पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करताना एमआयटी औरंगाबाद हेरिटेज हाफ मॅरेथॉनमध्ये महिला गटातील २५ कि. मी. अंतरात विजेतेपद पटकावले. पुरुष गटात सैन्य दलाचा दूधनाथ अव्वल आला. २१ कि. मी. गटात भाग्येश पाटील व प्राजक्ता गोडबोले यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात अव्वल स्थान पटकावले, तर १0 कि. मी. मध्ये औरंगाबादच्या साई केंद्रातील खेळाडू नंदिनी पवार हिने महिला गटात, तर पुरुष गटात मोदावत हार्या यांनी चॅम्पियनचा बहुमान मिळवला.
औरंगाबाद ब्लॅक बक्सतर्फे आयोजित या मॅरेथॉनमध्ये औरंगाबाद, महाराष्ट्र आणि देशासह विदेशातूनही २ हजारांपेक्षा जास्त धावपटूंनी सहभाग नोंदवला. ऐतिहासिक दौलताबाद किल्ला ते जगप्रसिद्ध वेरूळ लेणी यादरम्यान अतिशय नयनरम्य परिसरातून ही मॅरेथॉन झाली. दौलताबाद येथील वॉटरपार्क चा परिसर आज पहाटे पाच वाजल्यापासूनच हजारो महिला-पुरुष धावपटूंनी गजबजून गेला होता. स्पर्धेच्या प्रारंभ स्थळी मैदानावर सर्व धावपटूंकडून वॉर्मिंग अप करवून घेण्यात आले. सकाळी सहा वाजता आमदार अतुल सावे यांच्या हस्ते झेंडा दाखवल्यानंतर या मॅरेथॉनचा श्रीगणेशा झाला. ढोल-ताशांच्या निनादात धावपटंूचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर क्रमाने २१ किलोमीटर आणि दहा किलोमीटर असे गट सोडण्यात आले. पंचेवीस किलोमीटरचा मार्ग हा वेरूळ आणि लेण्यांमधून ठेवण्यात आला होता. मार्गावर जागोजागी मार्गदर्शक फलक, पायलट गाड्या, पाणी, बिस्कीट, गोळ्या, चॉकलेट, संत्री असे धावपटूंसाठी आवश्यक सर्व ठेवण्यात आले होते.
आ. अतुल सावे यांच्यासह ज्ञानोबा मुंढे, पुरातत्व विभागाचे शिवकांत बाजपेयी, एमआयटीचे मुनीष शर्मा, यज्ञवीर कवडे, अनिरुद्ध कर्वे, गौरव भारुका, ज्येष्ठ मॅरेथॉन धावक मुंबईचे सतीश गुजराण व मुकुंद भोगले यांच्या उपस्थितीत पदकविजेत्यांना गौरवण्यात आले.
औरंगाबाद महामॅरेथॉन जिंकण्याचे लक्ष्य : ज्योती गवते
औरंगाबाद हेरिटेज मॅरेथॉन जिंकण्याचा विश्वास होताच. गतवर्षी आपण १ तास ४३ मिनिटांत अव्वल ठरलो होतो; परंतु यंदा हवामान आणखी थंड असल्याने १ मिनिटआधीच आपण हे अंतर पूर्ण केल्याचे समाधान वाटते.
विशेष म्हणजे अलाहाबाद येथे १९ नोव्हेंबरला आपण ४२ कि. मी.ची मॅरेथॉन जिंकल्यानंतर सराव केला नव्हता. सराव केला असता तर वेळेत आणखी सुधारणा झाली असती.
आपले पुढील टार्गेट हे लोकमत समूहातर्फे आयोजित महामॅरेथॉन जिंकण्याचे आणि जानेवारी महिन्यात होणाºया मुंबई मॅरेथॉनमध्ये अव्वल तीन जणांत स्थान मिळवण्याचे आहे, अशी प्रतिक्रिया मराठवाड्याची आंतरराष्ट्रीय महिला मॅरेथॉनपटू परभणीच्या ज्योती गवते हिने लोकमतशी बोलताना व्यक्त केली.