परभणी-मनमाड दुहेरीकरण थंडबस्त्यात गेल्याने मराठवाड्यावर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 07:23 PM2019-01-31T19:23:55+5:302019-01-31T19:24:32+5:30
हा मार्ग नजीकच्या काळात होणे आता अशक्य आहे.
औरंगाबाद : परभणी- औरंगाबाद- मनमाड रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचा प्रस्ताव थंडबस्त्यात गेला आहे. परळी- नगर आणि दौंड- मनमाड रेल्वेमार्गाच्या कामामुळे रेल्वे बोर्डाने दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणाचा अहवाल बाजूला ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे हा मार्ग नजीकच्या काळात होणे आता अशक्य आहे. वर्षानुवर्षे मराठवाड्यावर अन्याय होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
परभणी ते मुदखेड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम ५० टक्क्यांवर पूर्ण झालेले आहे. उर्वरित काम मार्च, एप्रिल-२०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. परभणी ते मुदखेड दुहेरीकरण मार्गी लागल्याने अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या परभणी-मनमाड मार्गाचेही दुहेरीकरण होईल, अशी अपेक्षा मराठवाड्यातून व्यक्त होत होती. दक्षिण मध्य रेल्वेकडून परभणी- औरंगाबाद- मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्तावदेखील रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे.
या प्रस्तावाला कधी मंजुरी मिळते, याकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागलेले असताना सध्यातरी त्याला रेल्वे बोर्डाकडून प्राधान्य नसल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. स्वानंद सोळंके यांनी माहितीच्या अधिकारात मनमाड- औरंगाबाद- परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या परिस्थितीची विचारणा केली. यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून बुधवारी माहिती देण्यात आली. परभणी- औरंगाबाद- मनमाड हा २९१ कि.मी.चा मार्ग आहे. यासाठी २,१९९.४१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे; परंतु सध्या मराठवाड्यात परळी- नगर आणि दौंड- मनमाड या रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असल्यामुळे सर्वेक्षण झालेल्या परभणी- मनमाड या मार्गाच्या दुहेरीकरणाचा सध्या कोणताही विचार नसल्याचे बोर्डाने म्हटले आहे. बोर्डाच्या माहितीनुसार यंदाच्या अर्थसंकल्पातही दुहेरीकरणाला हिरवा कंदिल मिळणार नाही.
महाव्यवस्थापक म्हणाले होते...
औरंगाबाद दौऱ्यात १२ डिसेंबर २०१८ रोजी तत्कालीन दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव म्हणाले होते, दुहेरीकरणाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविलेला आहे. आगामी अर्थसंकल्पात मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. मंजुरी मिळाल्यानंतर प्लॅन तयार करून तीन वर्षांत दुहेरीकरण होईल. मंजुरी मिळाल्यानंतर नियोजन केले जाईल, असे ते म्हणाले होते. त्यामुळे मंजुरी कधी मिळणार आणि नियोजन कधी होणार, हा प्रश्न आहे.
मुख्यमंत्री काही बोलत नाहीत
मुदखेड- परभणी या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम आधीच लांबणीवर पडले आहे. त्यात आता मनमाड- परभणी दुहेरीकरणही २०२२ पर्यंत अशक्य दिसते. मराठवाड्यातील रेल्वेमार्गासंदर्भात नुसती बनवाबनवी सुरू आहे; परंतु मुख्यमंत्री काहीही बोलत नाहीत. दुहेरीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे.
-ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती
प्रवाशांची सतत गैरसोय
एकेरी रुळावरून क्षमतेपेक्षा अधिक रेल्वे सध्या धावत आहेत. त्याची रेल्वे प्रशासनाला कल्पना आहे. तरीही दुहेरीकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. फक्त कोट्यवधींचे उत्पन्न घेण्यावरच भर दिला जात आहे. दुहेरीकरणाअभावी प्रवाशांना सतत गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे.
-संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सेना