चहाची टपरी चालवून मुलास शिकवले अन् पैशासाठी त्यानेच जिवन संपवले
By राम शिनगारे | Published: May 3, 2023 08:56 PM2023-05-03T20:56:57+5:302023-05-03T20:57:31+5:30
मुकुंदवाडीतील घटना : एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
छत्रपती संभाजीनगर : चहाची टपरी चालवून वडिलांनी मुलास एमजीएम संस्थेत ॲनिमेशनचे शिक्षण दिले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यास नोकरी लागली नाही. उलट तोच वडिलांकडे सतत पैशाची मागणी करीत होता. बुधवारी सकाळीही त्याने पैशाची मागणी केली. वडिलांनी नकार देताच त्याने वाद घालुन बेडरुममध्ये जाऊन गळफास घेतला. ही घटना मुकुंदवाडीतील म्हाडा कॉलनीत घडली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती निरीक्षक गाैतम पातारे यांनी दिली.
प्रतिक प्रकाश खेमनार (२५, रा. प्लॉट नं. १४७, म्हाडा कॉलनी, मुकुंदवाडी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिकने एमजीएम संस्थेत नुकताच ॲनिमेशन डिप्लोमा पूर्ण केला होता. आई वडिलांना एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्याचे घरात लाड होते. वडिल चहाची टपरी चालवत हाेते तर आई घरात मुलांना मेसचे डब्बे तयार करून देत होती. प्रतिकला लहान बहिणी आहे. बुधवारी सकाळी त्याने वडिलांकडे खर्च करण्यासाठी पैशाची मागणी केली. वडिलांकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी नकार दिला.
त्यामुळे रागावलेल्या प्रतिकने घरातील काही वस्तुंची तोडफोड करीत वाद घातला. त्यानंतरही त्याला पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे रागारागात तो घरातील बेडरुममध्ये गेला. त्याने आतधुन कडी लावून घेत बेडरुममधील छताच्या हुकाला रुमालाने गळफास घेतला. प्रतिक बेडरुम उघडत नसल्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा तोडून आत पाहिले असता, त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर तात्काळ त्यास घाटी रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल केले. त्याठिकाणी तपासून डॉक्टरांनी मृत घोषीत केले. अधिक तपास एमआयडीसी सिडको पोलिस करीत आहेत.