मोबाइलवरून पालक रागावले; रागात घर सोडलेल्या मुलीसोबत धक्कादायक प्रकार, दोघांना अटक

By सुमित डोळे | Published: May 29, 2024 01:10 PM2024-05-29T13:10:18+5:302024-05-29T13:10:47+5:30

रेल्वे स्टेशनवरील पाणी विक्रेत्याचा मदतीच्या बहाण्याने अत्याचार 

Parents angry over mobile use; Shocking incident with girl who left home in anger, two arrested | मोबाइलवरून पालक रागावले; रागात घर सोडलेल्या मुलीसोबत धक्कादायक प्रकार, दोघांना अटक

मोबाइलवरून पालक रागावले; रागात घर सोडलेल्या मुलीसोबत धक्कादायक प्रकार, दोघांना अटक

छत्रपती संभाजीनगर : सतत मोबाइल वापरण्यावरून आई- वडील रागावल्याने १४ वर्षीय नेहा (नाव बदलले आहे)ने घर सोडले. मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर रडत असताना तेथे पाणी विक्री करणाऱ्या सोहेल अब्दुल रजाक कादरी (२५, रा. गल्ली क्र. २, विश्रांतीनगर) याने तिला सहानभूती दाखवत मदतीचे आश्वासन दिले. एका लॉजवर राहण्यासाठी जागा देण्याचे सांगून तेथे तिच्यावर सलग पाच दिवस अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सोहेलसह हॉटेल शांग्रिलात राहण्यासाठी मदत करणारा आदित्य कडुबा धीवर (२२) यालाही पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली.

नववीत शिकणाऱ्या नेहाचे कुटुंबीय पुंडलिकनगरमध्ये राहतात. सतत मोबाइलवर बोलत असल्याने आई- वडील तिला रागावले होते. त्यातून वाद झाल्याने १४ मे रोजी सकाळी ती घरातून निघून मुकुंदवाडी रेल्वेस्थानकात गेली. तेथे दिवसभर रडत हाेती. सोहेल हा सर्व प्रकार पाहत होता. काही तासांनी त्याने तिच्याकडे विचारणा केली. मुलगी एकटी असल्याची संधी साधत सहानुभूती दाखवून मदतीचे आश्वासन दिले. ‘तू माझ्या मित्राच्या लॉजवर राहू शकतेस’, असे सांगत रेल्वेस्थानक परिसरातील हॉटेल शांग्रिला येथे ठेवले. नंतर अत्याचार करणे सुरू केले.

मुलीला रस्त्यात सोडले
पुढे सोहेल तिला धमकावत अत्याचार करत राहिला. १७ मे रोजी हॉटेल सोडून त्याने तिला एका मित्राच्या घरी ठेवले. तिच्या मोबाइलमधील सीमकार्ड फेकून दिले. नंतर २६ मेपर्यंत बहिणीकडे ठेवले. रविवारी पत्नीला भेटायला जाण्याचे कारण सांगून तिला सिडको बसस्थानकावर सोडून निघून गेला. काही काळ तेथेच बसलेल्या नेहाने कुटुंब रागावेल म्हणून मदतीसाठी मित्राशी संपर्क साधला. मित्राकडून कुटुंबीयांना ही बाब कळताच त्यांनी पोलिसांना हा प्रकार कळवला. पुंडलिकनगरचे पोलिस निरीक्षक राजेश यादव, उपनिरीक्षक संदीप काळे हे सातत्याने तिचा शोध घेत होते. नेहाने पोलिसांना प्रकार सांगितला. काळे यांनी लगेच धीवरला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतर सोहेलचे घर गाठले. त्याला झाेपेतच उचलले. न्यायालयाने दोघांनाही ३० मेपर्यंत कोठडी सुनावली. नेहाचा बालकल्याण समितीसमोर जबाब नोंदवून तिला शासकीय बालगृहात पाठवण्यात आले.

हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीला प्रवेश कसा?
शहरातील अनेक हॉटेल, लॉजमध्ये सातत्याने अत्याचाराच्या घटना घडत आहेत. नियमानुसार १८ वर्षे पूर्ण मुला- मुलींनाच प्रवेश देता येतो. पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होते. परिणामी, हॉटेल व्यावसायिक अल्पवयीन मुला- मुलींना खोली देत आहेत.

Web Title: Parents angry over mobile use; Shocking incident with girl who left home in anger, two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.