ब्रेनडेड झालेल्या चिमुकल्याच्या मृत्यूने पालक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 07:02 PM2019-02-09T19:02:19+5:302019-02-09T19:04:51+5:30

योगशाळेच्या अहवालानंतर दोषी डॉक्टर व संबंधितांवर गुन्हा दाखल होईल. 

The parents are angry with the death of a brain dead child | ब्रेनडेड झालेल्या चिमुकल्याच्या मृत्यूने पालक संतप्त

ब्रेनडेड झालेल्या चिमुकल्याच्या मृत्यूने पालक संतप्त

googlenewsNext
ठळक मुद्देसातारा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद हेडगेवार रुग्णालयातील डॉक्टरांवर आरोपअहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्णय होणार

औरंगाबाद :  डॉ़  हेडगेवार रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या बे्रनडेड झालेल्या दोनवर्षीय चिमुकल्याची गुरुवारी (दि़. ७) रात्री ११.२५ वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालवली़  दरम्यान रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान तज्ज्ञ समितीच्या उपस्थितीत शुक्रवारी यशच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर दोषी डॉक्टर व संबंधितांवर गुन्हा दाखल होईल. 

यश कैलास भातपुडे (२ वर्ष, रा. हायकोर्ट कॉलनी, सातारा) या रुबेला लसीकरण केलेल्या दोन वर्षीय मुलाचा गुरुवारी रात्री डॉ. हेडगेवार रुग्णालयात आधी ब्रेनडेड झाला आणि त्याच रात्री मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास डॉ़  हेडगेवार रुग्णालयात डॉक्टर आणि यशचे पालक व नातेवाईक यांच्यात शाब्दिक चकमकही झाली होती. त्यामुळे रुग्णालयाविरुद्ध तक्रार देण्यासाठी भातपुडे हे सातारा पोलीस ठाण्यात गेले मात्र पोलिसांनी भातपुडे यांची तक्रार घेण्यास नकार दिला होता. गुरुवारी रात्री यशचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक आणखीनच संतप्त झाले. संतप्त नातेवाईकांनी पुन्हा डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला़  यशचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची माहिती लगेच द्या, अशी मागणी रात्री लावून धरली.

यशच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी जवाहनगर पोलिसांकडे लेखी स्वरुपात तक्रार दिली आहे़  रुबेला लसीकरण व उपचारामध्ये हलगर्जीपणा, अवास्तव औषधी देणारे डॉ़  हेडगेवार रुग्णालय प्रशासन यांना जबाबदार ठरवून यशच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी भातपुडे यांनी केली आहे. यशच्या मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात यावे, अशी मागणीही यशच्या पालकांनी केली. 

मृत्यू झाल्यानंतर यशचा मृतदेह सकाळपर्यंत हेडगेवार रुग्णालयातच ठेवण्यात आला. हेडगेवार रुग्णालयात गुरुवारी रात्रीपासून भातपुडे यांचे नातेवाईक जमा झाले होते. शुक्रवारी सकाळी रुग्णालयात पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. दुपारी दोन वाजता यशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आला. भातपुडे कुटुंबियांची शवविच्छेदन ‘इन कॅमेरा’ करण्याची मागणी होती; मात्र घाटी रुग्णालयातील तीन डॉक्टरांच्या देखरेखीखाली शवविच्छेदन करण्यात आले.  शुक्रवारी प्रतापनगर स्मशानभूमीत चिमुकल्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अहवाल आल्यानंतर गुन्हा  
यशचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्यासाठी व्हिसेरा प्रयोगशाळेला पाठविला असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल होणार आहे, असे सातारा ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक सुभाष भोसले यांनी सांगितले. दरम्यान, सातारा ठाण्यात यशच्या मृत्यूची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांचा आरोप
यशचे काका अविनाश भातपुडे यांनी सांगितले की, इन कॅमेरा शवविच्छेदनाची आमची मागणी मान्य झालेली नाही. हेडगेवार रुग्णालयाने यशवर काय उपचार केले यासंबंधीची कागदपत्रे दिलेली नाहीत. या प्रकरणात गुन्हाही दाखल झालेला नाही. त्यामुळे आम्ही सोमवारी न्यायालयात जाण्याचा विचार करीत आहोत. 

योग्यप्रकारे उपचार  
रुग्णालयात सदर बालक दाखल झाल्यानंतर त्याच्यावर योग्यप्रकारे उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या उपचारासंदर्भातील संपूर्ण माहिती नातेवाईकांना दिलेली आहे़. मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदन आणि व्हायरोलॉजी लॅबचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल.
- डॉ़  अश्विनीकुमार तुपकरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ़  हेडगेवार रुग्णालय

Web Title: The parents are angry with the death of a brain dead child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.