पालकांनो, लक्ष द्या, मुले मोबाइलवर कोणता गेम खेळतात; ‘टास्क’च्या मागे तर नाहीत ना?

By संतोष हिरेमठ | Published: July 31, 2024 08:22 PM2024-07-31T20:22:28+5:302024-07-31T20:22:55+5:30

मुले सतत मोबाइलवर : पालकांनो, लक्ष द्या, नाही तर पुण्यातील घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती

Parents, pay attention to what games children play on mobile; Are they not behind the 'task'? | पालकांनो, लक्ष द्या, मुले मोबाइलवर कोणता गेम खेळतात; ‘टास्क’च्या मागे तर नाहीत ना?

पालकांनो, लक्ष द्या, मुले मोबाइलवर कोणता गेम खेळतात; ‘टास्क’च्या मागे तर नाहीत ना?

छत्रपती संभाजीनगर : हल्ली मुले मिळेल त्या जागेत आणि वेळेत मोबाइलवर गेम खेळण्यात मग्न असतात. पालकांनी ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. एखादा टास्क पूर्ण करायला लावणारा गेम तर खेळत नाहीत ना, याची खातरजमा पालकांनी केली पाहिजे. अन्यथा पुण्यातील घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले.

चौदाव्या मजल्यावरून उडी मारून १५ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली. ऑनलाइन गेम खेळताना दिलेल्या टास्कमुळे मुलाने उडी मारली. मुलांमध्ये मोबाइल वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. मुले जर मोबाइलवर गेम खेळत असतील तर त्याकडे पालकांनी लक्ष द्यावे.

गेमिंगने टोकाचे पाऊल का?
घाटीतील मनोविकारशास्त्र विभागातील डाॅ. प्रदीप देशमुख म्हणाले, एकदा मोबाइल गेमिंगचे व्यसन जडले, की ती व्यक्ती कल्पनाविलासात राहायला लागते. वास्तविक जीवनाशी संपर्क कमी व्हायला लागतो. या काल्पनिक गोष्टींचा प्रभाव एवढा प्रचंड असतो की, व्यक्ती नकळत चुकीचे वागू लागते आणि टोकाचे कृत्य करून बसते. प्रतिबंध उपचारापेक्षा चांगला. पालकांनी पाल्यांसोबत शिस्त लावण्यासाठी मैत्रीपूर्वक संवादासोबतच अधिकारवाणीनेही वागणे गरजेचे आहे.

उपाय सुचविणे शक्य
व्यक्तीच्या विचारांचे आणि वर्तनाचे विश्लेषण करून मोबाइल ॲडिक्शनवर नियंत्रण मिळवण्याचे उपाय सुचवले जातात. मनोचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली उपचार प्रभावी ठरतात. मोबाइलवर अवलंबून राहण्याच्या समस्यांचे उपाय शोधा, असे मानसोपचार तज्ज्ञ समुपदेशक डाॅ. संदीप सिसोदे म्हणाले.

का लागते मोबाइल गेमिंगचे वेड?
मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही म्हणून मोबाइल देणे, मुले खूप हट्ट, जिद्द करतात म्हणून मोबाइल देणे, अभ्यास करण्याचा मोबदला म्हणून मोबाइल देणे, आजकाल सगळेच मोबाइलवर असतात म्हणून मोबाइल देणे, अशा अनेक कारणांमुळे मोबाइल तसेच गेमिंगचे व्यसन जडते.

पालकांनो, ही घ्या काळजी...
- मुलांना पुरेसा वेळ द्या.
- मुलांच्या भावनिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि खेळाविषयक गरजा यांचा समतोल साधून द्या.
- केवळ मुलांवर मोबाइल वापरण्यावर निर्बंध योग्य नाही. मोठ्यांनीही मोबाइलचा वापर नियंत्रित ठेवावा.
- मुलांना वेळ देणे आणि त्यांच्याशी संवाद हे दोन्ही महत्त्वाचे आहे.
- मुलांच्या वर्तणुकीतील बदल, एकटेपणा, चिडचिड याकडे दुर्लक्ष करू नये.
- समुपदेशन आणि मानसोपचार घेण्यासाठी कोणताही न्यूनगंड बाळगू नये.

Web Title: Parents, pay attention to what games children play on mobile; Are they not behind the 'task'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.