औरंगाबाद जिल्ह्यात ‘माझी कन्या भाग्यश्री’कडे पालकांची पाठ; वर्षभरात अवघ्या आठ जणांनी घेतला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 04:43 PM2018-08-14T16:43:03+5:302018-08-14T16:45:26+5:30
दोन वर्षांपूर्वी अमलात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेसाठी जिल्ह्यात लाभार्थीच मिळाले नाहीत.
औरंगाबाद : दोन वर्षांपूर्वी अमलात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेसाठी जिल्ह्यात लाभार्थीच मिळाले नाहीत. तथापि, गेल्या महिन्यात अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन एक किंवा दोन मुलींनंतर शस्त्रक्रिया करणा-या पालकांचा शोध घेतला. त्यांना भेटून या योजनेबाबत समुपदेशन केले. तेव्हा कुठे दोन वर्षांत अवघी ८ कुटुंबे तयार झाली व त्यांना जि.प. महिला व बालकल्याण विभागाने या योजनेचा लाभ दिला.
प्रामुख्याने मुलींचे शिक्षण व आरोग्यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रूणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने राज्यात १३ फेब्रुवारी २०१४ रोजी ‘सुकन्या’ योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतर १ एप्रिल २०१६ पासून ‘सुकन्या’ योजनेचे ‘माझी कन्या भाग्यश्री’ या नव्या योजनेत विलीनीकरण करण्यात आले. ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना सुरू झाल्यापासून तब्बल दीड वर्षे या योजनेला समाजातून प्रतिसादच मिळत नव्हता. त्यामुळे शासनाने १ आॅगस्ट २०१७ रोजी या योजनेचे निकष शिथिल केले.
पूर्वीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्र्यरेषेखालील तसेच एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणारी कुटुंबे पात्र ठरविण्यात येत होती.
सुधारित योजनेत दारिद्र्यरेषेची अट काढून टाकण्यात आली असून, उत्पन्न मर्यादा साडेसात लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. एका मुलीनंतर आई किंवा वडिलाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर मुलीच्या नावे ५० हजार, तर दोन मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असेल, तर दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपये बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येतात. या ठेवीवरील व्याज मुलीला वयाच्या सहाव्या आणि बाराव्या वर्षी काढता येईल. मुद्दल आणि व्याज दोन्ही रक्कम वयाच्या १८ व्या वर्षी काढता येईल.
स्वातंत्र्यदिनी जाणार घरोघरी
यासंदर्भात जि.प.चे महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले की, ही योजना मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त आहे. मुलांएवढेच मुलींवर प्रेम करणारे अनेक आहेत. मुलीच्या जन्मानंतर पाळणा थांबविणारेही अनेक आहेत; पण समाजामध्ये एक किंवा दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेण्याची मानसिकता फारसी रुजलेली नाही. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी स्वातंत्र्यदिनी अंगणवाडीसेविका, मुख्यसेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी हे घरोघरी जाऊन योजनेची माहिती देतील. प्रामुख्याने एक किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबांची माहिती घेऊन त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे.