आई-वडिलांनी मुलांना चांगले शिक्षण द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:04 AM2021-02-24T04:04:57+5:302021-02-24T04:04:57+5:30
औरंगाबाद : समाजात आणि बदलत्या जगाची परिस्थिती लक्षात घेऊन आई-वडिलांनी आपल्या मुलांना धार्मिक, समाजातील दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे, असे ...
औरंगाबाद : समाजात आणि बदलत्या जगाची परिस्थिती लक्षात घेऊन आई-वडिलांनी आपल्या मुलांना धार्मिक, समाजातील दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे, असे मत मौलाना फारुख वस्तानवी यांनी व्यक्त केले.
जमियत उल उलेमा हिंद (अरशद मदनी) यांच्यातर्फे रोशन गेट परिसरातील अब्बास फंक्शन हॉल येथे 'समाज सुधार' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वस्तानवी म्हणाले की, प्रत्येक मुलाला आधुनिक शिक्षण दिले गेलेच पाहिजे. त्यासोबत मुलांना धार्मिक शिक्षण देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी दाखविलेल्या मार्गावर कसे चालावे, हे सुद्धा मुलांना शिकवा. यावेळी मौलाना अरशद मदनी याचे चिरंजीव मौलाना सैयद अजहर मदनी यांनी नमूद केले की, प्रत्येक मुस्लीम बांधव प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यावर प्रेम करतो. मुंबई येथील मौलाना मुफ्ती हफीजउल्लाह, मौलाना मुफ्ती युसूफ यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी शहरातील इतर धर्मगुरू सहभागी झाले होते, त्यांनी समाजात वाढत असलेल्या चुकीच्या बाबींवर भाष्य केले. शहराध्यक्ष हाफिज अब्दुल अजीम यांनी तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण प्रचंड वाढत आहे, तरुणाईला वाचविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध वसाहतींमध्ये या कामासाठी समित्या नेमाव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली. वाजीद कादरी यांनीही मुलांना चांगले शिक्षण देण्याची मागणी केली. मौलाना शरीफ निजामी, मौलाना अतीकुर्रहमान शिराजी सल्फी, अतिक पालोदकर यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मुस्तफा खान यांनी केले. हाफिज इकबाल अन्सारी त्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मौलाना कैसर खान यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.