'आई-बाबा, माफ करा,पुढच्या जन्मात परतफेड करेन'; जाळून घेतलेल्या मुलाची नोट जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 01:10 PM2022-11-23T13:10:41+5:302022-11-23T13:14:30+5:30
तरुणीची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सिद्धार्थ संशोधक विद्यार्थी वसतिगृहातील जाळून घेतलेल्या संशोधक विद्यार्थ्याच्या खोलीत डिजिटल फळ्यावर लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी जप्त केली. त्यावर त्याने 'आई-बाबा, मला माफ करा... दुसऱ्या जन्मात आपली परतफेड करेन' अशी सुरुवात करीत आठ ओळी लिहिल्या आहेत. त्याशिवाय डायरीमध्ये प्रेमप्रकरणाविषयी लिहून ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. जळालेल्या तरुणीचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती घाटीतील डॉक्टरांनी दिली.
गजानन खुशालराव मुंडे (३०, रा. दाबा दिग्रज, ता. जिंतूर, जि. परभणी) या संशोधक तरुणाने शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्थेतील प्रयोगशाळेत स्वत:ला जाळून घेत पीएच.डी. संशोधक पूजा कडूबा साळवे (रा. एन ७, सिडको) या तरुणीला कवटाळले होते. यात गजाननचा मृत्यू झाला तर तरुणी मृत्यूशी झुंज देत आहे. दोघांनी पोलिसांना परस्परविरोधी जबाब दिल्यामुळे प्रकरणाचा गुंता वाढला आहे. त्यामुळे वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी मार्गदर्शन करीत तपासाला दिशा दिली. महिलेचा विषय असल्यामुळे उस्मानपुऱ्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांच्याकडे तपास सोपवला आहे. त्याच वेळी पोलीस उपायुक्त अपर्णा गिते, सहायक आयुक्त अशोक थोरात, बेगमपुऱ्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार, बागवडे, उपनिरीक्षक विशाल बोडखे, विक्रमसिंग चौहान यांच्या पथकांनी घटनास्थळासह वसतिगृहाचा पंचनामा केला. यात त्यांनी दोघांचे मित्र, प्राध्यापक, सहकारी इतरांचे जबाब नोंदवले. त्याशिवाय पोलिसांनी विद्यापीठातील वसतिगृहातील तरुणाच्या खोलीचे कुलूप तोडून आतमध्ये असलेली सुसाईड नोट, दुचाकीसह इतर साहित्य पंचनामा करून जप्त केले. त्यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भगवान साखळे, डॉ. भास्कर साठे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
हे लिहिले सुसाईड नोटवर
‘आई-बाबा, मला माफ करा... मला हे केल्याशिवाय (आत्महत्या) पर्याय नाही. तिने दोन-अडीच लाख रुपये उकळले. मला ब्लॅकमेल करीत आहे. नातेवाइकांनीही हातपाय तोडण्याची मला धमकी दिली. तुम्हालाही त्यांच्यापासून धोका आहे. त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. या जन्मात नाही करू शकलो तरी पुढच्या जन्मात आपली नक्की परतफेड करीन,’ असे नोटमध्ये म्हटले आहे. त्याशिवाय काही महिन्यांपूर्वी मुलीपासून होत असलेल्या त्रासाविषयी लिहिलेला कागदही पोलिसांना सापडला.
हायकोर्टातील वकिलाचा सल्ला
गजानन याच्या दाव्यानुसार त्याने जालना येथील रामनगरच्या महादेव मंदिरात तरुणीसोबत लग्न केले होते. त्याला तिला नांदवायचे होते, मात्र त्यास तिचा नकार असल्यामुळे त्याने हायकोर्टातील एका वकिलाचा कायदेशीर सल्लाही घेतला होता. याविषयीचा उल्लेखही त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे. त्या दृष्टीनेही पोलिस तपास करीत आहेत.
मुलाच्या मृत्यूविषयी आई अनभिज्ञ
गजाननने जाळून घेतल्याची माहिती पोलिसांनी त्यांच्या वडिलांना सोमवारी सायंकाळी दिली. वडील, भाऊ, मामासह इतर काही नातेवाईक घाटीत मध्यरात्री दाखल झाले. मुलाने जाळून घेतल्याची माहिती मंगळवारी दुपारपर्यंत त्याच्या आईला देण्यात आलेली नव्हती. सकाळी मुलाच्या नातेवाइकांचा जबाब नोंदविल्यानंतर दुपारी १२च्या सुमारास मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
मुलीची प्रकृती चिंताजनक
गजानन याने जाळून घेतल्यानंतर कवटाळलेली पूजा मृत्यूशी झुंज देत आहे. तिचा चेहरा, गळा जळला असून, त्याचे प्रमाण ४५ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान आहे. तिच्यावर घाटीतील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती घाटीतील डॉक्टरांनी दिली.
पोलिसांची कारवाई नियमानुसार
पूजाने १५ ऑक्टोबर २०२२ रोजी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गजाननविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्याचा निर्णय घेतला. मात्र तिच्या नातेवाइकांनी मुलीचे शिक्षण, करिअर, लग्न, इ. बाबींचा विचार केल्यानंतर विनयभंगाऐवजी अडवणूक केल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला. त्यावर नियम १४९ नुसार गजानन यास नोटीस देऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली. सिडको ठाण्यातही तरुणीने केवळ तोंडीच तक्रार दिली होती. त्याच प्रकारे १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी तक्रार दाखल केली. त्याचा तपास हवालदार करीत होते. पोलिसांनी या प्रकरणात कोणत्याही प्रकारची हलगर्जी केली नसल्याचे सहायक आयुक्त अशोक थोरात यांनी सांगितले.
मृत मुलासह नातेवाइकावर गुन्हा
गंभीर जखमी तरुणी पूजा हिचे मेहुणे नितीन जोगदंडे यांच्या तक्रारीनुसार मृत गजानन मुंडे याच्यासह त्याच्या आई, वडिलांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सोमवारी रात्री उशिरा बेगमपुरा पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.
दोघांना संशोधनासाठी शिष्यवृत्ती
गजाननला प्राणीशास्त्र विषयातील पीएच.डी. संशोधनासाठी महाज्योती संस्थेची शिष्यवृत्ती मंजूर झाली होती. त्या पैशातून त्याने महागडी दुचाकी खरेदी केल्याचे चौकशीत समोर आले आहे. तसेच त्याने संशोधनाचा अंतिम आराखडाही विद्यापीठास सादर केला होता. जखमी तरुणी नेट परीक्षा जीआरएफमध्ये उत्तीर्ण झालेली होती. तिला सुरुवातीला बार्टी संस्थेची शिष्यवृत्ती मंजूर झाली होती. तिचे संशोधन पूर्ण झाले होते. तिने शोधप्रबंधही विद्यापीठास सादर केला होता. तिची मौखिक परीक्षा घेणे बाकी होते, असे सूत्रांनी सांगितले.
विद्यापीठ समितीच्या मॅरेथॉन बैठका
विद्यापीठाने नेमलेल्या चौकशी समितीचे प्रमुख कुलसचिव डॉ. भगवान साखळे, सदस्य डॉ. अंजली राजभोज व डॉ. ई.आर. मार्टिन यांनी दिवसभरात १६ पेक्षा अधिक जणांचे जबाब नोंदवले. त्यातून दोघांविषयीची माहिती जमा केली. यामध्ये पीएच.डी.चे मार्गदर्शक, विभागप्रमुख, सहकारी विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.